- पुणे : राजकारणात पक्षनिष्ठा, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक असलेले रमेशदादांसारखे कणखर व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी आणि येथील सामाजिक व धार्मिक सलोखा टिकविण्यासाठी रमेशदादांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी बुधवारी केले. तुम्ही रमेशदादांना आमदार करून विधानसभेत पाठवा आम्ही त्यांना मंत्री करू. कँटोन्मेंटच्या विकासासाठी निधी कमी पडला तर मी माझ्या खासदारनिधीतून मदत करेन, पण कँटोन्मेंटचा विकास आता थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुख मान्यवरांचे चर्चासत्र कॅम्पमधील टाउन प्लाझा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कँटोन्मेंटच्या नागरिकांना केवळ आमदार नाही तर मंत्री निवडायचा आहे, असे प्रतापगढी यांनी सांगताच रमेश बागवे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. राजस्थानचे माजी मंत्री आणि अजमेर दर्ग्याचे अध्यक्ष आमीन पठाण, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मौलाना निजामुद्दीन चिश्ती, डॉ. मौलाना काझमी, अली इनामदार, शफी इनामदार, जावेद शेख, भोलासिंग अरोरा, फादर रॉड्रिक्स, कवीराज संघेलिया, विनोद मथुरावाला, प्रसाद केदारी, नरुद्दीन अली सोमजी, सलीम शेख, चंद्रशेखर धावडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि उमेदवार रमेश बागवे यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध समाजातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
राज्यघटना बदलण्यासाठी ‘अब की बार चारसो पार’ हा नारा देणाऱ्या लोकांना देशातील जनतेने २४० जागांवर आणले. जग अबोल लोकांचा इतिहास वाचत नाही. आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराबद्दल आवाज उठविण्याची गरज आहे. बटेंगे तो कटेंगे, हिंदू स्त्रियांचे मंगळसूत्र हिसकावले जाईल या फसव्या आणि द्वेषी प्रचाराला आपण प्रेमाच्या दुकानातून उत्तर द्यायचे आहे. द्वेषाच्या बाजारात राहुल गांधी यांचे प्रेमाचे दुकान महाराष्ट्र आणि देशाला पुढे नेऊ शकते. महाराष्ट्रची अस्मिता वाचविण्यासाठी गुजरातच्या रिमोटवर चालणारे सरकार हद्दपार करण्याची गरज आहे. लोकशाही आणि राज्यघटना वाचवली नाही तर अल्पसंख्याक समाजाचे स्थान धोक्यात येईल. लोकशाही आणि देश वाचविण्यासाठीची ही लढाई आहे. मोदींच्या काळात महागाई वाढल्याने लाडक्या बहिणींच्या डोळ्यांत अश्रू आहेत. हिंदू-मुस्लिम, कलम ३७०, घुसखोरी ही भाषा बोलून भाजप जाती-धर्मात तेढ निर्माण करीत आहे, अशी टीका प्रतापगढी यांनी केली.
पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे लोक राहत असल्याने हा छोटा भारत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथून १३ हजारांचे मताधिक्य मिळाले. भाजपने लोकांमध्ये भांडणे लावली आहेत. निवडणुकीसाठी पैशांचा पाऊस पाडला जात आहे, अशी टीका बागवे यांनी केली.
घोरपडी येथील श्रावस्तीनगर, बालाजीनगर, गुलमोहर पार्क, श्रीनाथनगर, निगडेनगर, बी. टी. कवडे रस्ता, डोंबरवाडी आणि कवडेमळा या परिसरात बुधवारी सायंकाळी निघालेल्या रमेश बागवे यांच्या पदयात्रेचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पदमजी पोलिस चौकीजवळ कोपरा बैठक पार पडली.