तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी :
जेसीबीने खोदकाम करताना तळेगाव दाभाडे परिसरातून गेलेल्या इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते… धोक्याचा भोंगा वाजतो… सर्वत्र धावपळ सुरू होते…अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका ‘सायरन’ वाजवित गावात पोचतात… यंत्रणेची धावपळ सुरू होते. मग तेल कंपनीच्या पाईपलाईनला आग लागल्याच्या चर्चेने कातवी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, ही आग नसून इंधन वाहिनीच्या गळतीनंतर लागणाऱ्या आगीचे कंपन्यांचे संयुक्त ‘मॉकड्रील’ असल्याची माहिती मिळताच, सर्वांचा जीव भांड्यात पडला.
इंधन वाहिनीला गळती होत आग लागते आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याची चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. तळेगाव बूस्टर स्टेशन (मुंबई-पुणे-सोलापूर पाईपलाइन) आणि चाकण रिसीविंग स्टेशन (उरण-चाकण-शिक्रापूर पाईपलाईन) यांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ही चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. मॉक ड्रिलमध्ये दोन महत्त्वाचे आपत्कालीन परिस्थितीची प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यामध्ये अशा संकटांना प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता तपासण्यात आली.
यावेळी एलपीजी गॅसचे चाकणचे लोकेशन इन्चार्ज नितीन दलाल, मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईनचे तळेगाव दाभाडेचे इन्चार्ज प्रशांत भुरे, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल चे अधिकारी, पोलीस अधिकारी, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, कातवी ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रात्यक्षिकामध्ये जेसीबीने खोदकाम करत असताना पाईप फुटून तेलगळती होऊन आग लागल्यानंतर आगीचे लोळ उठू लागले. सुरक्षा रक्षकांनी चारही बाजूंनी सुरवातीला फोमची फवारणी केली. मग पाण्याचे फवारे चारही बाजूने सोडण्यात आले. वीस मिनिटांत हाय-प्रेशर क्लॅम्पचा वापर करून गळती नियंत्रणात आणली. गळती झालेल्या तेलाची सुरक्षित हाताळणी करण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद वाहन वापरण्यात आले. चीफ घटना कंट्रोलरच्या आदेशानुसार साईट घटना कंट्रोलरने ‘सर्व काही सुरक्षित ’ असल्याचा ‘सिग्नल’ दिला. अर्धा तास श्वास रोखून धरणारी चित्तथरारक आणि जीवघेणी प्रात्यक्षिके संपुष्टात आली.
आपत्कालीन परिस्थितीत जलद कृती, योग्य अग्निशमन उपकरणांचा वापर आणि पथकांमधील समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे यातून स्पष्ट केले. या सरावाने विविध एजन्सींमधील समन्वय ज्यामध्ये उद्योगतज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांचा समावेश होता. अत्याधुनिक उपकरणांचा वापर, पर्यावरण व सार्वजनिक सुरक्षितता, प्रशिक्षण आणि जनजागृती, तसेच तेल आणि वायू उद्योगातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी हे मॉक ड्रिल एक महत्त्वाचे पाऊल ठरली.