पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चुकीच्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. शहरात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांची नोंदणी आपल्याकडे आहे. या ५८ रुग्णालयांपैकी १२ रुग्णालयांनी वर्षभरात एकही खाटा रिकाम्या ठेवल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासह या रुग्णालयांनी सगळ्याच रुग्णांना सरसकट शंभर टक्के शुल्क लावल्याची बाब देखील समोर आली आहे. याअनुषंगाने बुधवारी (दि. १६) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी धर्मादाय
अधीक्षकांकडे त्या १२ रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, या रुग्णालयांवर जर २ दिवसात
कोणतीही कारवाई केली नाही तर जोरदार आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी धर्मादाय अधीक्षक शंकर गडाळे यांना निवेदन देण्यात आले.
धर्मादायच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयांवर ‘धर्मादाय’ असा ठळक उल्लेख असणे अपेक्षित आहे. गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा
राखीव असल्याचा फलक दर्शना भागात लावणे देखील आवश्यक आहे. तसेच या योजनांची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा
संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे देखील गरजेचे आहे. मात्र, शहरात बहुतांश सगळ्याच धर्मादाय रुग्णालयांकडून या निर्देशांना केराची टोपलीच
दाखवल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते. धर्मादायचे नियम न पाळल्याने गरीब व गरजू रुग्ण शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. या रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास देखील मनाई असताना, या नियमाचे देखील पालन शहरातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये होताना दिसून येत नाही.
महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, हरजीवन हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, एन. एम. वाडिया हॉस्पिटल, दीनदयाळ
मेमोरियल हॉस्पिटल, परमार हॉस्पिटल, मीरा हॉस्पिटल, गिरीराज हॉस्पिटल, मातोश्री मदनाबाई धारीवाल हॉस्पिटल, काशीबाई नवले जनरल
हॉस्पिटल आणि डॉ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर या १२ रुग्णालयांनी नियमानुसार गरीब रुग्णांसाठी बेड राखीव न ठेवल्याची
माहिती आपल्याच कार्यालयाद्वारे समोर आली आहे.
यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, नागरिकांना मरणास कारणीभूत ठरणाऱ्या, मनमानी पद्धतीने पैसे उकळणाऱ्या ‘धर्मादाय’च्या
नावाखाली लोकांना लुबाडणाऱ्या रुग्णालयांवर आपण कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, लवकरात लवकर या रुग्णालयांवर आपण योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विरोधात ‘आपलीही या प्रकाराला मूक संमंती’ असल्याचे समजून तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच भविष्यात ही ‘धर्मादाय’च्या नावाखाली चालणारी रुग्णालये नियमाप्रमाणे काम करतायेत की नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. रोहन सुरवसे पाटील यांच्यासह यावेळी दिपक चौगुले आणि ज्ञानेश्वर जाधव या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बुधवारी आम्ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त परदेशी यांना भेटलो. त्यांनी निवेदनाची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दोन दिवसांमध्ये जर धर्मादाय आयुक्त यांनी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या १२ हॉस्पिटलने गेल्या वर्षभरापासून गोरगरीब लोकांना योजनेचा लाभ दिला नाही त्या बारा हॉस्पिटल वरती दोन दिवसात कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
- रोहन सुरवसे पाटील
सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस