13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायाची एकमुखाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायाची एकमुखाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

कटकारस्थान करून रात्री-अपरात्री केली जाणारी आळंदी घाटांची तोडफोड व विद्रूपीकरण थांबवून, कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तातडीने सखोल चौकशी करावी…

पुणे-   तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या उत्तर तीरावर सुरू असलेले अत्यंत सुंदर व देखण्या घाटांचे शासनातर्फे रात्री-अपरात्री केले जाणारे विद्रूपीकरण ताबडतोब थांबवून, या मागील तथाकथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायातर्फे महाराष्ट्राचे जाणकार व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील नामवंत संत, कीर्तनकार, प्रवचनकार इ. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करणार आहेत. अशी माहिती विश्व शांती केंद्र (आळंदी) व कार्याध्यक्ष, श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दि. ५ जुलै १९८८ रोजी ह्या घाटांच्या बांधणीची सुरुवात झाली. त्यापूर्वी, इंद्रायणीचे तीर अत्यंत गलिच्छ आणि ओंगळवाण्या अवस्थेत होते. त्याचे सुशोभीकरण आणि वारकर्‍यांना सुरक्षित व स्वच्छ घाटांच्या माध्यमातून इंद्रायणी नदीत स्नान व इतर उपचार करून देण्याचे स्वप्न, अनेक संत सज्जनांनी पाहिले. त्यात वारकरी परंपरेचे अध्वर्यू ह.भ.प. वै. धुंडा महाराज देगलूरकर, ह.भ.प. वै. शंकरबापू शिंदे-आपेगांवकर, ह.भ.प. वै. बाळासाहेब भारदे, ह.भ.प. वै. किसन महाराज साखरे, पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. पी.जी. भिडे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. माधवराव सूर्यवंशी, आळंदीचे तत्कालीन नगराध्यक्ष श्री. सुरेश गांधी आणि त्यांचे सहकारी व महाराष्ट्रातील इतर हजारो वैष्णव वारकरी इ.चा समावेश होता.


वाट खडतर होती, अनेक अडथळे येऊन सुध्दा महाराष्ट्रातील लाखो वारकर्‍यांच्या प्रत्यक्ष सहभागाने, सुमारे १८ – २० वर्षांच्या कालावधीत हे कार्य पूर्ण झाले आणि नदीच्या दुतर्फा अत्यंत देखण्या आणि टिकाऊ अशा घाटांची निर्मिती झाली. घाट बांधून झाल्यावर, इंद्रायणी नदीच्या दक्षिण तीरावर विश्वरूप दर्शन मंच देखील उभारण्यात आला.
योगायोगाने, या कार्यासाठी भारताचे तत्कालीन शिक्षणमंत्री व संत वृत्तीचे शास्त्रज्ञ असलेले डॉ. मुरली मनोहर जोशी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. हे संपूर्ण कार्य श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र (आळंदी) यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णत्त्वास नेण्यात आले.
परंतु, सुमारे महिन्याभरापूर्वी रात्रीच्या वेळी अचानक आळंदी इंद्रायणी नदीच्या उत्तर तीरावरील घाट फोडण्याच्या कामास सुरूवात झाली. चौकशी करता असे सांगण्यात आले की, तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्याखाली सांडपाण्याचे पाईप टाकण्याचे काम जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार केले जात आहे. अधिक चौकशी असे लक्षात आले की, सदरील आदेश हा सुमारे १३ महिन्यांपूर्वीचा म्हणजे १५ मार्च २०२४ चा असून, सुमारे १२ कोटी रुपयांचे हे काम एक वर्षाच्या विलंबाने का सुरू झाले आहे, हे कळू शकले नाही.
या प्रकरणांमुळे खालील प्रश्न निर्माण होतात.
१. कार्याची एकूण व्याप्ती बघता त्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च खरंच आवश्यक आहे का?
२. हे घाट सुमारे १५-२० वर्षाच्या कालावधीमध्ये पुण्यातील श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र (आळंदी) या दोन संस्थांच्या संयुक्त पुढाकाराने आणि महाराष्ट्रातील समस्त वारकरी भाविकभक्तांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदानाच्या माध्यमातून बांधले गेले आहेत. सदरील घाटांचे सर्व संमतीप्राप्त नकाशे वरील संस्थांकडे उपलब्ध असताना देखील अशा प्रकारचे कार्य अचानकपणे आणि त्यांना विश्वासात न घेता का सुरू करण्यात आले?
३. घाट बांधतानाच त्यांच्याखाली सुमारे ६ फूट उंच व ४ फूट रुंदीची काँकीटची गटारं बांधण्यात आली होती, जी आळंदी शहराचे सांडपाणी वाहून नेण्यास समर्थ होती, असे असतानादेखील नवीन सांडपाण्याची व्यवस्था करण्याची काय गरज होती?
४. हे कार्य शक्यतोवर रात्रीच्या वेळेतच करण्यात आले, त्यामागचे कारण काय?
५. सदरील घाटावर वारकरी संप्रदायातील अनेक अध्वर्यू संतमंडळींच्या समाध्या आहेत. या समाध्यांना बांधकामा दरम्यान हानी पोहचली असून, या समाध्यांची शासनातर्फे कशा प्रकारे दुरुस्ती करण्यात येणार आहे?
या सर्व प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेला व भावनेला तडा गेलेला आहे. तसेच माऊलींच्या आणि जगद्गुरूंच्या पवित्र कार्याला काळीमा फासला गेला आहे, अशी भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे. या व अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आणि या किळसवाण्या प्रकाराची चौकशी करून यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार जसे ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे, ह.भ.प. श्री. धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. श्री. बाळासाहेब बडवे, ह.भ.प. श्री. यशोधन महाराज साखरे, ह.भ.प. श्री. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. श्री. शालीकराम खंदारे, ह.भ.प. श्री. महेश महाराज नलावडे, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवीकुमार चिटणीस, प्रकुलगुरु डॉ. मिलींद पांडे, कुलसचिव श्री. गणेश पोकळे, डॉ. महेश थोरवे इ. मा. मुख्यमंत्र्यांकडे भेटण्याची वेळ मागून, त्यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन देणार आहेत.
या परिषदेला डॉ. स्वाती कराड-चाटे, हभप यशोधन साखरे महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!