मुंबई, – मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर दिवा ते कोपर स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना, दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि काहीजण खाली पडले.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गर्दी आणि दरवाजात उभे राहण्याची प्रवृत्ती यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जणांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेचे काही धक्कादायक व्हिडीओही समोर आले आहेत.
या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी दरवाजे बंद ठेवण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. दररोज लाखो प्रवासी प्रवास करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.