सोलापूर : मागील काही दिवसांपासून भीमा आणि नीरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ४०,०२१ क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडले जात असून, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर भीमा नदी पात्रातील सर्व बंधारे व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी अशा बंधाऱ्यांवरून प्रवास करू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उजनीतून सध्या ३१,६०० क्युसेक तर वीर धरणातून ६,५३७ क्युसेक विसर्ग सुरू आहे. यासोबतच मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळेही अतिरिक्त पाणी नदीत येत असल्याने सोमवारी संध्याकाळपर्यंत विसर्गाचा वेग ४० हजार क्युसेकच्या पुढे गेला आहे.
या वाढलेल्या विसर्गामुळे भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, उजनीतून सोडलेले पाणी पंढरपूरात पोहचल्याने चंद्रभागा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदी पात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा आला असून, भाविकांची गर्दी लक्षात घेता होडीचालकांना एका होडीत केवळ २० प्रवाशांपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक भाविकांना घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सजग राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा आवाहन केले आहे.