पुणे : “विनाकष्टाचे आणि फुकट, ते सर्व निर्धारपूर्वक नाकारा. आपल्या कुठल्याही कृतीतून राष्ट्राचे नुकसान तर होत नाही ना, हा विचार प्रथम मनात आणा. पाठ्यपुस्तकाबाहेर डोकवा. समाजात, सभोवताली काय घडत आहे, याची नोंद घ्या. देशसेवा हा प्राधान्यक्रम ठेवा”, असा सल्ला सियाचिन आणि कूपवाडा येथे लष्करासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग युनिट उभारणाऱ्या व सैनिकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सौ. सुमेधाताई चिथडे यांनी विद्यार्थिनींना दिला.
सावित्री फोरम आयोजित ‘विद्यानिधी’ उपक्रम आणि ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी सावित्री फोरमतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘सावित्री’ पुरस्कार सुमेधाताई चिथडे यांना राष्ट्रीय सर्वोत्तम शिक्षक पुरस्काराचे मानकरी, श्री विद्या विकास सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि नामवंत शैक्षणिक सल्लागार श्रीकांत सुतार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे ‘विद्यानिधी’ उपक्रमांतर्गत पुण्यातील व आसपासच्या ग्रामीण भागांतील इयत्ता आठवी ते दहावीच्या हुशार पण गरजू अशा ८० विद्यार्थिनींना दीड लाखाच्या शैक्षणिक मदतनिधीचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रस्ता येथे हा पुरस्कार समारंभ संपन्न झाला.
सुमेधाताई म्हणाल्या,‘पुरस्कार ज्या नावाने मिळतो, त्याचे मोल अधिक आहे. हा सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार आहे. आजच्या सर्व विद्यार्थिनींनी स्वतःमधील सावित्रीबाईंचा शोध घ्यायला हवा. स्वतःवरील विश्वास, परिश्रमांची तयारी, सातत्य, ध्येयाचा ध्यास आणि त्यासाठी आवश्यक ते कौशल्य प्राप्त करण्याची तयारी, यांच्या आधारे तुम्ही जीवनात यशस्वी व्हा. आयते, फुकटचे सर्व नाकारा. कष्टाने मिळवलेल्या गोष्टींनाच मोल असते, हे लक्षात ठेवा. पारंपरिक विद्याशाखांप्रमाणेच लष्करी क्षेत्रातही अनेक संधी आहेत. त्या मिळवा. स्वतःला सिद्ध करून दाखवा. इतरांशी तुलना करू नका, स्पर्धा स्वतःशीच करा. मन. बुद्धी आणि शरीर, यांच्यात एकवाक्यता असू द्या. आपले सैनिक सर्व प्रकारच्या प्रतिकूलतांवर मात करत आपले संरक्षण करतात, याचे भान ठेवा. तक्रार, कारणे आणि अपेक्षांपासून दूर राहा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल”.
सुतार म्हणाले, “सुमेधाताईंचे कार्य हे देशसेवा आणि मानवसेवेचे आदर्श आणि उत्कृष्ट उदाहरण आहे. सावित्री फोरमच्या सर्व भगिनी सावित्रीबाईंच्या नावाचा वारसा आणि वसा जपत आहेत, हेही कौतुकास्पद आहे. विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असते. त्यामुळे स्वतःला ओळखा, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हा. कर्तृत्व सिद्ध करून राष्ट्रसेवेचा भाग व्हा”.
प्रारंभी दीपप्रज्ज्वलन आणि प्रेरणागीत सादर करण्यात आले. फोरमच्या अध्यक्षा मोनाली कोद्रे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अनिता ढोले पाटील व सुप्रिया ताम्हाणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनुष्का गायकवाड आणि अदिती या विद्यार्थिनींनी मनोगत मांडले. मेघा केवटे यांनी आभार मानले. अश्विनी बोरुडे आणि शीतल कचरे यांनी सूत्रसंचालन केले. सावित्री फोरमच्या संयोगिता कुदळे, दीपाली पांढरे, शैला माळी, माधवी खरे, गायत्री लडकत आदी यावेळी उपस्थित होत्या.