पुणे- पुण्याचे ऐतिहासिक वैभव असलेल्या विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग येत्या जुलै अखेर पर्यटक व नागरिकांसाठी खुला होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून वाड्याच्या संवर्धनाचे काम सुरू असून, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर या ऐतिहासिक ठेव्याचा मुख्य भाग पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
विश्रामबागवाडा हा पेशव्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण वाडा असून, १७५० साली बाजीराव पेशवे (द्वितीय) यांनी हे वास्तु खरेदी करून १८१० मध्ये याचे बांधकाम पूर्ण केले होते. पुढे अनेक ऐतिहासिक घडामोडींना सामोरे जात ही वास्तू पुणे महानगरपालिकेचे मुख्यालय देखील राहिली. वाड्याच्या दर्शनी भागाची प्राचीन लाकडी कलाकुसर, महिरपी दरवाजे आणि सज्जा यांचे जतन करून त्याचे मूळ रूप पुन्हा उभे करण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या प्रगतीस वेळ लागल्याने संदीप खर्डेकर यांनी या कामाच्या विलंबावर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला आंदोलक पवित्रा घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्य अभियंता देशमुख यांनी उपअभियंता सुनील मोहिते यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवले आणि कामाला वेग मिळाला.

सुनील मोहिते यांनी स्पष्ट केले की, “प्राचीन लाकडी घटकांची पुनर्बांधणी करताना अचूकतेसाठी वेळ लागला, मात्र आज आम्ही तेच स्वरूप जपण्यात यशस्वी ठरलो आहोत. जुलै अखेर दर्शनी भाग पूर्णपणे लोकांसाठी खुला केला जाईल.”
या ठिकाणी सध्या पोस्ट ऑफिस व पीएमपीएलचे पास केंद्र कार्यरत असून, वाड्याचे दालन क्रमांक १ व २ आधीच पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
संदीप खर्डेकर यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “मनपा प्रशासनाने अखेर आपला शब्द पूर्ण करत नागरिकांसाठी ऐतिहासिक वास्तू खुली केली, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र आता या वाड्याच्या व्यवस्थापनाचा पुढील निर्णय लवकर घेऊन, तो पूर्णपणे लोकांसाठी सतत खुला ठेवावा.