पिंपरी, – आजचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे “एआय” चा आहे. हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर मानवी विचार पद्धतीला पूरक असलेलं स्मार्ट साधन आहे. या तंत्रज्ञाना मुळे तुमचे विचार आणि संकल्पना अधिक व्यापक होतील व तुमचा दृष्टिकोन अधिक चांगला होण्यासाठी सामर्थ्य मिळेल. “एआय” हे नवोपक्रमाचं (Innovation – इनोव्हेशन) केंद्रबिंदू बनलं आहे. या हॅकेथॉनमध्ये तुम्ही एखाद्या समस्येवर उपाय शोधत असताना त्याला “एआय” ची साथ दिली. तर ते केवळ तांत्रिक नव्हे तर स्मार्ट उपाय उपलब्ध करून देईल. “एआय” शिकणं म्हणजे फक्त कोडिंग शिकणे नाही. तर डेटामधून अर्थ शोधून भविष्यातील दिशा निश्चित करणे आहे. “एआय” हे मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पूरक आणि मार्गदर्शक ठरेल. सध्या यामुळे उद्योगात अधिक वेगाने आणि अचूकपणे निर्णय होत असल्याने आरोग्य, शेती, शिक्षण, वाहतूक अशा सर्व क्षेत्रांत आमूलाग्र परिवर्तन घडत आहे असे कॅपजेमिनी, पुणे, वरिष्ठ संचालक निलेश येवला यांनी “एआय” संशोधनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करताना सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च येथे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एक्सेंचर, पुणे सहयोगी व्यवस्थापक श्रीकांत सावलकर, एचएसबीसी, वरिष्ठ सल्लागार दीपक रसाळ, इन्फोसिस, पुणे चे सचिन पोतदार, डेव्हऑप्स मैत्रीटेक, मुंबई चे मनोज किनगे, टचकोर कंपनीचे वरिष्ठ सॉफ्टवेअर विकास अभियंता विशाल महाजन, एचसीएल टेक्नॉलॉजीज तांत्रिक आर्किटेक्ट शिरीष चौधरी, ॲमडॉक्सचे वरिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर धोंडूतात्या मठपती यांनी उपस्थित राहून परीक्षण केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. राहुल मापारी, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. डॉ. अर्चना चौगुले, संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. विजय कोतकर, समन्वयीका दिप्ती चौधरी आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल अंतर्गत घेण्यात आली. देशभरातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा प्रेरित करते. या मध्ये ४५० पेक्षा जास्त विद्यार्थी संघ सहभागी झाले होते. त्यापैकी ५० संघांची पुढच्या फेरी साठी निवड करण्यात आली.
पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमुळे
नवीन संकल्पनाची निर्मिती करण्यास प्रोत्साहन मिळते.
यामध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी प्रथम ती समस्या समजून घेणे. त्याच्या मुळाशी पोहचणे आणि विश्लेषण करून त्यावर उपाय शोधून निराकरण झाले तर यश मिळेल. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर समाजातील वास्तविक समस्यांना डिजिटल पर्याय शोधण्याचा मार्ग आहे. तुमच्या प्रोजेक्टचा उद्देश समाज उपयोगी असावा असे डॉ. तिवारी यांनी सांगितले.
स्वागत समन्वयीका प्रा. दिप्ती चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तृप्ती खेरडे आणि प्रा. दिपा महाजन यांनी आभार मानले.
पीसिईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे. विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.