आचार्य श्री वर्धमान सागर महाराजांच्या सान्निध्यात पुण्याच्या शाकाहार प्रचारकाचा सन्मान
पुणे : शाकाहार, अहिंसा आणि जीवदया या मूल्यांचा जागर प्रसार करत समाजात शांतता आणि सद्भावनेचा संदेश देणारे पुण्याचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. कल्याण गंगवाल यांच्या ‘सुखी जीवन का आधार : शाकाहार’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्याच बरोबर त्यांना “भारत शांती समृद्धी रत्न” या राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान वात्सल्य वारिधि आचार्य श्री वर्धमान सागर महाराज यांच्या सान्निध्यात आयोजित दोन दिवसीय आचार्य पद प्रतिष्ठापन शताब्दी महोत्सव या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी आचार्य श्रींनी डॉ. गंगवाल यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना म्हटले की, “डॉ. साहेब ८१ वर्षांच्या वयातही दिवस-रात्र शाकाहार, अहिंसा आणि जीवदया यासाठी कार्यरत आहेत. त्यांचे समर्पण समाजासाठी प्रेरणादायी आहे.” गेल्या ५५ वर्षांपासून डॉ. गंगवाल यांनी भारतासह विदेशात जाऊन जैन धर्मातील शांती, समृद्धी, अहिंसा आणि जीवदया यांचा संदेश दिला आहे. भारतीय संस्कृती आणि मानवतेच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या या अनुकरणीय कार्यासाठी त्यांना “भारत शांती समृद्धी रत्न” या सन्मानाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य श्री शांतिसागर महाराजांच्या चित्र अनावरण आणि दीपप्रज्वलनाने झाली. हा शुभारंभ धर्मपरायण व्यक्तिमत्व श्रीमती सुशीला पाटनी (आर. के. मार्बल ग्रुप) आणि डॉ. कल्याण गंगवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. याच प्रसंगी डॉ. गंगवाल यांच्या शाकाहारावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय तीर्थ रक्षा समितीचे माजी अध्यक्ष श्री अरविंद दोषी यांच्या हस्ते करण्यात आले. या मंगल प्रसंगाला पूज्य मुनिश्री १०८ हितेंद्र सागर महाराज तसेच संपूर्ण संघाची गौरवशाली उपस्थिती लाभली. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात डॉ. गंगवाल यांनी आचार्य श्री १०८ शांतिसागर महाराजांवरील भाषण देत त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण करून दिली.