17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
HomeTop Five Newsनवले पुलावर मध्यरात्री भीषण दुर्घटना

नवले पुलावर मध्यरात्री भीषण दुर्घटना

दोन ट्रक–कारचा महाभयंकर अपघात, 8 जणांचा मृत्यू

Accident News | पुणे : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. दोन ट्रक आणि एका कारचा झालेल्या समोरासमोरच्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर दोन्ही ट्रकला भीषण आग लागली आणि क्षणार्धात घटनास्थळावर ओरड-आरड्याचा गोंधळ उडाला . धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कार या दोन ट्रकच्या मध्ये अक्षरशः चिरडून अडकून बसली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, साताऱ्याकडून पुण्याकडे वेगाने येत असलेल्या दोन ट्रकची नवले पुलाजवळ समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेनंतर मधोमध येणारी एक कार दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली आणि लगेच ज्वाळांनी पेट घेतला. काही क्षणांतच दोन्ही ट्रक जळून खाक झाले, तर कार पूर्णपणे ओळखू न येण्याजोगी झाली आहे.

या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, ही संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक प्रवासी ट्रकमध्येच अडकले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र कार अजूनही जळालेल्या ट्रकच्या अवशेषांमध्ये अडकलेली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

दुर्घटनेत सुमारे १६ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र वेगामुळे झालेली भीषण समोरासमोर धडक हे प्राथमिक कारण असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

अपघातानंतर नवले पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून आसपासच्या परिसरात प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. पुणे–सातारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने हजारो वाहनं तासन्तास अडकून पडली. अखेर वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सुरू करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस पथक, क्रेन यंत्रणा आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. दोन्ही ट्रक जळून कोसळल्यामुळे आणि कार त्यांच्यात दाबली गेल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले आहे. अवशेष हटवण्यासाठी रात्रीपासून मोठ्या क्रेनद्वारे प्रयत्न सुरू आहेत.

नवले पुलावरील धोकादायक उतार आणि सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
3.1kmh
18 %
Tue
17 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!