पिंपरी, – पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर, तीर्थक्षेत्र आळंदी व देहू च्या कुशीत वसलेल्या आणि श्री नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी गावात अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी येथे चौथे एक दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलन रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान उच्चशिक्षित डॉ. सीमा सागर काळभोर यांना देण्यात आला आहे. त्या इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना झाल्यापासून संस्थेत सक्रिय आहेत. त्यांची निवड इतर महिला साहित्यिकांना देखील प्रेरणादायी आहे असे इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून संमेलनाच्या या वर्षीच्या अध्यक्षपदाचा मान स्थानिक महिला साहित्यिकांना देण्याचा निर्णय परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला. डॉ. काळभोर यांनी विवाहानंतर वाचन, लेखन, भटकंती, सामाजिक कार्य तसेच साहित्यिकांशी संपर्कात राहून त्यांचे विचार ग्रहण करण्याची आवड जोपासत उच्च शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१५ साली त्यांना पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचे शिल्पकार माजी खासदार अण्णासाहेब मगर यांचे जीवन चरित्र म्हणजेच “महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व आणि सहकार चळवळ अण्णासाहेब मगर विशेष अभ्यास” या विषयावर पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेल्या गाव खेड्यातील साहित्यिकांना पाठबळ व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. लेखक, साहित्यिक, वाचक, प्रकाशक यांच्याशी समन्वय साधून साहित्य संमेलना बरोबरच अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात. प्रथम इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांना मिळाला होता. दुसऱ्या वर्षी लोकसाहित्याचे अभ्यासक व लेखक सोपान खुडे आणि तिसऱ्या वर्षी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी अध्यक्षपद भूषविले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी दिली.
*इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. सीमा काळभोर यांचा अल्पपरिचय*
प्रकाशित साहित्य “माऊली – किसान योद्धा” (प्रस्तावना – नितीन गडकरी); “स्पोर्टिंग स्पिरिट – शरद पवार” (प्रस्तावना – श्रीनिवास पाटील); “आदर्श सरपंच – प्रभाकर दादा” (प्रस्तावना – बाबा कल्याणी); “कर्मयोगी – अण्णासाहेब मगर” (प्रस्तावना – शरद पवार); “साधनेचा तेजदीप – भानुदास अण्णा” (प्रस्तावना – डॉ. विश्वनाथ कराड) आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तसेच “शरद पवार : एक व्यक्तिवेध”; “वाचन संस्कृती – काळाची गरज” हे शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. सहकार भारती प्रकाशन संस्थेच्या सहकार महर्षी या ग्रंथात मार्तंड धोंडो तथा अण्णासाहेब मगर यांच्यावरील विस्तृत लेख प्रकाशित झाला आहे. डॉ. सीमा काळभोर यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने दोन वेळा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच आकुर्डी येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टने देखील पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ समिती सदस्य आहेत.


