चिंचवड : श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या 464 व्या समाधी संजीवन सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने श्रींची महापूजा, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, महासाधू मोरया गोसावी महाराज यांचे चरित्र पठण, नेत्र व दंत चिकित्सा शिबिर, यापुढे दर संकष्टी चतुर्थीला नित्यनेमाने होणारी पवनामाईची आरती या आगळ्यावेगळ्या पण अतिशय स्तुत्य आणि सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करता येईल.
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी अतिशय पावन झाल्याची भावना गणेशभक्तांमधे असते. आजच्या चतुर्थीच्या मुहूर्तावर रविवारची सुट्टी आल्याने मोरया भक्तांसाठी जणू ही पर्वणीच ठरली. सकाळी 6 वाजल्या पासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रख्यात चौघडा वादक नितीन दैठणकर यांच्या कलाविष्कराने सकाळ रम्य झाली, यानंतर श्रीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते झाली.
सामुदायिक अथर्वशीर्ष पठण
त्यानंतर संस्कृती संवर्धन विकास महासंघ आणि स्थानिक शाळा यांच्या सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने एक वेगळेच पवित्र्य परिसरात अनुभवता आले. यानंतर मोरया गोसावी महाराजांचे चरित्र पठण, श्रीचा सामुदायिक अभिषेक झाला. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि राजू शिवतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्र व दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले सोबतच रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. यात अनेक दात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
यावर्षी पासून प्रती चतुर्थीला पवनामाईचे पावित्र्य राखण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी तिची आरती करण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली, आजच्या पहिल्या आरतीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, ॲड. देवराज डहाळे उपस्थित होते, कालभैरवनाथ उत्सव समितीचे आवेश चिंचवडे, गणेश मिरजकर यांच्या हस्तेआरती झाली आणि पवनानदीचे पावीत्र्य जपण्याचा संकल्प ही करण्यात आला.
मानसीताई बडवे यांच्या कीर्तनाचे आयोजन झाले. ज्यात मानसीताईच्या रसाळ वाणीने भाविक श्रोते तृप्त झाले.
योगेश सोमण यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आनंदडोह या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


