IND vs SA India beat South Africa by 7 Wickets 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना रविवार धर्मशाला येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ विकेट्सनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. या सामन्यात सर्व भारतीय गोलंदाजांनी विजयात मोलाचे योगदान दिले.
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या षटकापासून धक्के योग्य असल्याचे सिद्ध केले. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ११७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, भारताने हे छोटे आव्हान १५.५ षटकांत ३ गडी गमावून १२० धावा करत सहज पार केले आणि सामना ७ विकेट्स राखून जिंकला.
तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या विजयाचे खरे हिरो गोलंदाज ठरले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली.
या सामन्यासाठी भारताला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागले; जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे, तर अक्षर पटेल तब्येतीच्या कारणामुळे खेळू शकले नाहीत. त्यांच्या जागी हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित २० षटकांत फक्त ११७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. कर्णधार एडेन मार्करमने एकाकी झुंज देत ४६ चेंडूंमध्ये ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही.
क्विंटन डिकॉक (१) आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस (२) स्वस्तात बाद झाले. सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला तर खातेही उघडता आले नाही. तसेच, सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. डोनोवन फरेरा (२०) आणि एनरिक नॉर्खिया (१२) वगळता इतरांनी निराशा केली. या कामगिरीमुळे भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे.


