31.1 C
New Delhi
Thursday, May 28, 2026
HomeTop Five Newsतंत्रज्ञान व कडक कारवाईचा परिणाम

तंत्रज्ञान व कडक कारवाईचा परिणाम

पुण्यात वाहतुकीचा सरासरी वेग वाढला

पुणे : शहरातील वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र समोर आले असून, मागील वर्षाच्या तुलनेत वाहतुकीचा सरासरी वेग १० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गतवर्षी पुण्यात वाहतुकीचा सरासरी वेग ताशी १९.५ किलोमीटर इतका होता. सध्या तो वाढून २२.५ किलोमीटर प्रतितास झाला असून, ही वाढ सुमारे १०.४४ टक्के असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुढील टप्प्यात हा वेग ताशी ३० किलोमीटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शहर पोलिसांनी निश्चित केले आहे.

दरम्यान, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि दैनंदिन निरीक्षणातून शहरात ३२ ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी विशेष उपाययोजना राबवण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने सुधारणा केल्या जाणार आहेत. वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत असताना, ती सोडवण्यासाठी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून विविध उपाय अमलात आणण्यात येत आहेत.

वाहतूक पोलिसांनी वर्षभरात एकूण १८ लाख ७२ हजार २२५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सात लाख ६८ हजारांनी अधिक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्ष कारवाईच्या माध्यमातून आतापर्यंत ५४ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. विशेषतः विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अशा ५ लाख १ हजार ६६७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक प्रवाहाचे सूक्ष्म विश्लेषण

वाहतुकीचा वेग, कोंडी आणि प्रवाह यांचे सातत्याने विश्लेषण केले जात असून, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. महापालिकेची एटीएमएस प्रणाली तसेच गुगल मॅप, मॅपल्स आणि मॅप माय इंडिया या प्रणालींच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक मिनिटाचा वाहतूक आढावा घेतला जात असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

सिग्नल सिंक्रोनायझेशन, राँग साइड आणि ट्रिपल सीट वाहनचालकांवर कडक कारवाई, बॉटलनेक ठिकाणी सुधारणा, मिसिंग लिंक जोडणे, रस्त्यांवरील अडथळे हटवणे तसेच चौक व जंक्शन सुधारणा यांसारख्या उपाययोजनांमुळे वाहतुकीच्या वेगात सकारात्मक बदल झाल्याचे पोलिस प्रशासनाने नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
40 %
2.1kmh
0 %
Thu
44 °
Fri
43 °
Sat
38 °
Sun
40 °
Mon
41 °

Most Popular

Recent Comments