21.1 C
New Delhi
Tuesday, April 7, 2026
HomeTop Five Newsआत्मनिर्भर भारताच्या दिशेने तौरल इंडियाचे महत्त्वपूर्ण पाऊल-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने तौरल इंडियाचे महत्त्वपूर्ण पाऊल-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे भरत गीते राजदूत

पुणे: महाराष्ट्रात उद्योग यावेत, पुण्य-मुंबईबाहेर ग्रामीण भागात उद्योगांची उभारणी व्हावी, यासाठी भरत गीते यांची धडपड सुरु असते. महाराष्ट्रात गुंतवणूक व परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणून करार झाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष उद्योग उभारणीत रूपांतर करणारे भरत गीते महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे राजदूत आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने तौरल इंडियाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले.

ॲल्युमिनियम सॅंड कास्टिंगमध्ये देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुपा एमआयडीसी (अहिल्यानगर) येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार सुरेश धस, आमदार विक्रम पाचपुते, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री, नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारीअधिकारी आनंद भंडारी, ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ व तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते, संचालिका प्राची गीते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आत्मनिर्भर भारत उभारणीसाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘इम्पोर्ट सब्स्टिट्यूशन’ महत्त्वाचे असून, तौरल इंडियाचा सुपा येथील अत्याधुनिक प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या उच्च दर्जाच्या औद्योगिक घटकांचे उत्पादन आता देशातच होत आहे. संरक्षण, रेल्वे, ऊर्जा, एअरोस्पेस आणि मरीन क्षेत्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. दावोस करारांपैकी ७५ टक्के करार प्रत्यक्ष अंमलबजावणीत आले आहेत. उद्योगाचे विकेंद्रीकरण होत असून, सुपा एमआयडीसीसारख्या औद्योगिक केंद्रांमुळे उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. नगर जिल्ह्यात सुमारे ११,५१९ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून १८ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होतील. तसेच उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. एमआयडीसी क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,” असे स्पष्ट करत त्यांनी भरत गीते यांच्या कार्याचे कौतुक केले.

उदय सामंत म्हणाले, “महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला ताकद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दावोसमध्ये झालेल्या कराराची पूर्तता वर्षभरात करून गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकाने आदर्श घालून दिला आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या अपेक्षांना पूर्ण करण्याचे काम आपण करावे. मराठी लोकांनी उद्योगात यावे, यशस्वी व्हावे, त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याचे काम आम्ही करू.”

तौरल इंडियाच्या जर्मनीतील भागीदार लोथार टोनी म्हणाले, “जर्मन आणि भारताच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. आपण केलेली गुंतवणूक योग्यप्रकारे प्रत्यक्षात आलेली पाहून समाधान वाटते. दोन्ही देशातील ही भागीदारी यापुढेही अशीच चालू राहील.”

प्रास्ताविकात भरत गीते म्हणाले, “भारतात काहीतरी करावे, या भावनेतून जर्मनीतून परत आलो. दशकभरात चार पटीने हा प्रवास विस्तारला आहे. उद्योगाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यात उभारला आहे. ऊर्जा, संरक्षण, रेल्वे, विमान या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला. केलेला करार उत्पादनात साकारण्याचे काम केले. ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याचे काम करणार आहे. ग्रामीण मातीतला संस्कार सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. या सर्व प्रवासातील सर्व सहकार्‍यांचे, कुटुंबीयांचे आभार मानतो.”

तत्पूर्वी, आवारात उभारण्यात आलेल्या  ॲल्युमिनियम मॅन पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पूर्ण प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी केली. अभिनेत्री समीरा गुजर यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश जायभाये यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
21.1 ° C
21.1 °
21.1 °
60 %
3.6kmh
40 %
Tue
31 °
Wed
29 °
Thu
31 °
Fri
34 °
Sat
33 °

Most Popular

Recent Comments