32.1 C
New Delhi
Saturday, April 11, 2026
HomeTop Five Newsमाझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत

सिनेगीतकार समीर अंजान : 'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता

लोणी-काळभोर (पुणे) : मी आयुष्यभर हजारो रोमँटिक गाणी लिहिली आहेत. आशिकी, राजा हिंदुस्तानी, साजन, दिवाना, कुछ कुछ होता है या चित्रपटांतील गाणी आजही रसिकांकडून आवडीने ऐकली आणि गायली जातात. माझा चेहरा तितकासा परिचित नसला तरी मी लिहिलेली गाणी आणि त्या गाण्यांच्या ओळी आजच्या नवयुवकांच्या काळजाचाही ठाव घेतात. त्यामुळे, जोपर्यंत माझ्या लिखाणात रसिकांच्या काळजाला स्पर्श करण्याची ताकद आहे, तोपर्यंत मी लिहित राहणार. कारण लेखणात अमरत्वाची ताकद असते. सध्याचे युवकही खूप सुंदर लिहितात. त्यामुळे युवकांनी सुचेल ते लिहित राहायला हवे, असे आवाहन बॉलिवूडमधील हजारो प्रसिद्ध गाण्यांचे लेखक ज्येष्ठ सिनेगीतकार समीर अंजान यांनी केले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या आठव्या ‘पर्सोना फेस्ट-२६‘ या वर्षातील सर्वांत मोठ्या कला महोत्सवात बोलत होते. याप्रसंगी ‘मैंने प्यार किया’ चित्रपट फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, अभिनेत्री प्राची शहा-पांडे, सेलिब्रिटी आर.जे. संग्राम खोपडे, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, संगीततज्ज्ञ आदिनाथ मंगेशकर, डॉ. मुकेश शर्मा, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. सुदर्शन सानप, डॉ. गणेश पाठक, डॉ. रेणू व्यास, डॉ. सुराज भोयार, डॉ. दांडेश्वर बिसोई, डॉ. संगिता फुंडे आदी उपस्थित होते.

अभिनेत्री प्राची शहा-पांडे म्हणाल्या, एमआयटी एडीटी विद्यापीठाचा विश्वराजबागेतील हा कॅम्पस सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे. कारण या जागेला जगविख्यात अभिनेते राज कपूर यांचा सहवास लाभलेला आहे. त्यामुळे येथे प्रवेशित विद्यार्थी भाग्यशाली असून त्यांनी या विद्यापीठाचा जास्तीत जास्त फायदा आपली भावी कारकीर्द बहरविण्यासाठी करून घ्यावा.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात देशभरातील नामवंत गायक, सिनेगीतकार व कलाकारांची रेलचेल पाहायला मिळाली. यामध्ये सुप्रसिद्ध गायक अमित मिश्रा, मराठी अभिनेता क्षितीज दाते, सेलिब्रिटी डान्सर सिद्धेश थोरात तसेच पुणे महानगरपालिकेतील २२ वर्षीय युवा नगरसेविका कु. सिद्धी शिलिमकर यांचा समावेश होता.

याशिवाय या टेक्नो-कल्चर महोत्सवात नामांकित गायक व बँड यांचे थेट संगीत सादरीकरण (लाईव्ह कॉन्सर्ट), तंत्रज्ञान, व्यवसाय, कला व संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रांवरील माहितीपर सत्रे, विद्यार्थ्यांची नृत्य-नाट्य सादरीकरणे, कोडिंग व तांत्रिक स्पर्धा, क्रीडा आणि इतर मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रा. डॉ. कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दैनंदिन गरजांसोबत एखादा छंद जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्यातील कलाकार, गायक, चित्रकार, कवी आदी आवडी-निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यामाध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पर्सोना महोत्सवा’चे विद्यापीठातर्फे दरवर्षी आयोजन केले जाते. ‘पर्सोना’सारख्या कलात्मक उत्सवांच्या माध्यमातून देशाच्या कला-संस्कृतीत भर टाकण्याचे बाळकडू विद्यार्थ्यांना विद्यापीठीय जीवनात देण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. अशोक घुगे, डॉ. स्वप्निल शिरसाठ व प्रा. स्नेहा वाघटकर यांनी चोख पार पाडली.

चौकट
या विद्यापीठाला मोठा सांस्कृतिक वारसा – अभिनेत्री भाग्यश्री
विश्वराजबागेतील हे निसर्गसंपन्न एमआयटी एडीटी विद्यापीठ खूप मोठ्या सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे. दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा सहवास या ठिकाणाला लाभलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतक्या ऐतिहासिक जागेत कला, डिझाईन आणि तंत्रज्ञान या तिन्ही शाखांचे एकाच ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी मिळते. येथे अभियांत्रिकीसारख्या शाखेत प्रवेशित विद्यार्थी देखील त्यांच्यातील क्रीडा व सांस्कृतिक कला जोपासू शकतात आणि त्या विकसित करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘पर्सोना’सारखे मोठे व्यासपीठ उपलब्ध असल्याने ते अत्यंत भाग्यवान आहेत, असे मत ‘मैंने प्यार किया’ चित्रपट फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘दिल दिवाना बिन सजना के माने ना’ या गाण्याच्या ओळी अतिशय सुंदर आवाजात गात विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
32.1 ° C
32.1 °
32.1 °
25 %
5.1kmh
13 %
Sat
34 °
Sun
36 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
40 °

Most Popular

Recent Comments