36.6 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeताज्या बातम्यापूरस्थितीत तातडीची मदत मिळणार!

पूरस्थितीत तातडीची मदत मिळणार!

महापालिकेकडून ‘आपदा मित्र’ पथके सज्ज

पुणे : पावसाळ्यात नदीपात्रात पाणी सोडल्याने किंवा मुसळधार पावसामुळे निचरा न झाल्यास शहरातील अनेक भागांत फ्लॅश फ्लडची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडून ‘आपदा मित्र’ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार हे पाऊल उचलण्यात येत असून १५० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागासह विविध विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पूरस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रभाग व क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र आपत्ती निवारण पथके तयार करून त्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत (एनडीआरएफ) प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना महापौरांनी प्रशासनाला केली.

राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘आपदा मित्र’ नेमण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत तीन महिन्यांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती केली जाते. नियुक्तीसाठी ठरावीक निकष व नियम निश्चित करण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांना एनडीआरएफकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. मागील वर्षी महापालिकेने ४० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियुक्त केले होते. मात्र, यंदा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १० याप्रमाणे एकूण १५० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. हे कर्मचारी २४ तास क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध राहून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देतील.

बैठकीदरम्यान महापौरांनी पूरनियंत्रणासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पूरप्रवण भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचेही सांगितले. तसेच जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, महावितरण, पीएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन समन्वय वाढवण्याची सूचना करण्यात आली.

पूरप्रवण भागात एनडीआरएफमार्फत प्रशिक्षण देण्यासोबतच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी स्वतंत्र पूर व्यवस्थापन मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. पावसाळी वाहिन्यांच्या आराखड्यात आवश्यक सुधारणा करून नाल्यांचे संपूर्ण मॅपिंग पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पूरस्थिती वारंवार निर्माण होणाऱ्या ठिकाणी रिटेनिंग वॉलची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

शहरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका यंदा अधिक सज्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशिक्षित ‘आपदा मित्र’ पथकांमुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळण्यास गती येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
34 %
4.3kmh
68 %
Sun
37 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments