36.6 C
New Delhi
Monday, July 13, 2026
HomeBlogफुलांऐवजी ई-कचरा द्या- आमदार हेमंत रासने

फुलांऐवजी ई-कचरा द्या- आमदार हेमंत रासने

पर्यावरणपूरक वाढदिवस उपक्रम

पुणे : पारंपरिक पद्धतीला छेद देत पर्यावरणपूरक संदेश देण्याचा अनोखा उपक्रम कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी हाती घेतला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न आणता ‘ई-कचरा’ आणावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

१३ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येणार असून, शनिपारजवळील कवठी अड्डा येथील आरोग्य कोठीवर दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत ई-कचरा संकलन केले जाणार आहे. या माध्यमातून वाढदिवस साजरा करताना समाजाला पर्यावरणाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सध्या पुणे शहरासह संपूर्ण जगभरात ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शहरात दरवर्षी सुमारे २० ते २६ हजार टन ई-कचरा निर्माण होत असल्याचा अंदाज आहे. मात्र या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

मोबाईल, संगणक, टीव्ही, चार्जर, बॅटऱ्या यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर हा या समस्येचा मुख्य घटक ठरत आहे. या कचऱ्यातील शिसे, पारा, कॅडमियमसारखे घातक रसायने माती, पाणी आणि हवेत मिसळून प्रदूषण वाढवत आहेत. त्यामुळे या कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वापर आणि व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “ई-कचरा ही केवळ शहरापुरती मर्यादित समस्या नसून जागतिक पातळीवरील मोठे आव्हान आहे. आपण वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावली नाही, तर त्याचे गंभीर दुष्परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी वाढदिवसानिमित्त फुले न आणता ई-कचरा देऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा.”

दरम्यान, रासने यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ हे अभियानही राबवले जात आहे. इंदोर शहराच्या धर्तीवर पुणे स्वच्छ करण्याचा त्यांचा संकल्प असून, त्याची सुरुवात कसबा मतदारसंघातून करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध स्वच्छता उपक्रम राबवले जात आहेत.

यापूर्वी ‘फ्लेक्समुक्त कसबा’ ही मोहीम राबवून बेकायदा फलकांना आळा घालण्यात यश आले आहे. तसेच परिसरातील कचऱ्याचे ढिगारेही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आता वाढदिवसानिमित्त जमा होणाऱ्या ई-कचऱ्याची विल्हेवाट पुणे महापालिकेच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाणार असून, हा उपक्रम पुढे कायमस्वरूपी राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून, छोट्या कृतीतून मोठा बदल घडवण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
34 %
4.3kmh
68 %
Sun
37 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments