39.1 C
New Delhi
Sunday, April 19, 2026
Homeज़रा हट केरंगमंचावर पार पडला अनोखा विवाह सोहळा

रंगमंचावर पार पडला अनोखा विवाह सोहळा

नृत्यांगना वैष्णवी ढोरे आणि अभिनेता चंद्रकांत राऊत विवाहबंधनात

पुणे: झगमगाट, अवाजवी खर्च आणि रूढ परंपरांना फाटा देत पुण्यात नुकताच एक अनोखा आणि कलात्मक विवाह सोहळा पार पडला. आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम नृत्यांगना वैष्णवी ढोरे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता-निर्माता चंद्रकांत राऊत यांनी ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’अंतर्गत विवाह नोंदणी करत आपल्या सहजीवनाला सुरुवात केली. रंगमंचावर नृत्य सादर करत विवाहबद्ध होणारा हा कदाचित पहिलाच सोहळा असावा, ज्याची चर्चा आता सांस्कृतिक वर्तुळात रंगली आहे.
गेल्या १३ वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर या जोडीने रेशीमगाठीत केले. पुण्यातील कुडजे येथील ‘झपुर्झा आर्ट स्टुडिओ’मध्ये हा सोहळा पार पडला.

नृत्यातून अर्पण केली ‘साखरपुडा’ भेट – या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे वैष्णवीने सादर केलेले भरतनाट्यम. आपल्या कलेवर अपार श्रद्धा असलेल्या वैष्णवीने उपस्थितांसमोर ‘आरंगेत्रम’मधील अलरीपु, वर्णम, ‘सखी हे’, जयदेव आणि तिलाना हे प्रकार सादर केले. भरजरी पेहराव आणि पायांतील घुंगरांच्या नादात पार पडलेला हा विवाह सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास
वैष्णवीचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर तिचे पालनपोषण आजी-आजोबांनी केले.
२०१५-१६ मध्ये डॉ. स्वाती दैठणकर यांच्याकडे तिने नृत्याचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगना रमा वैद्यनाथन यांनी वैष्णवीची जिद्द ओळखून तिचे पालकत्व स्वीकारले. गेल्या १० वर्षांपासून ती दिल्लीत राहून नृत्यसाधना करत असून देशभरातील विद्यार्थ्यांना या कलेचे शिक्षण देत आहे.

दुसरीकडे, तिचे पती चंद्रकांत राऊत यांनी ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘परीस’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ख्वाडा’ चित्रपटाचे ते सह-निर्माते असून, त्यांचा ‘हैदराबाद कस्टडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयासोबतच चंद्रकांत यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपली ‘शेतकरी’ ही ओळखही जपली आहे.

निसर्ग संवर्धनाचा सामाजिक संदेश
केवळ विवाह करून ही जोडी थांबली नाही, तर त्यांनी सामाजिक भानही जपले. लग्नाला आलेल्या ५०० हून अधिक पाहुण्यांना त्यांनी विविध प्रकारच्या बियांचे वाटप केले. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत, या बिया आपल्या बागेत किंवा शेतात लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याला वैष्णवीच्या गुरु, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या रमा वैद्यनाथन, ‘ख्वाडा’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्यासह कला, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक कर्मकांडांपेक्षा कलेला आणि निसर्गाला दिलेले हे प्राधान्य आधुनिक पिढीसाठी एक नवा आदर्श ठरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
39.1 ° C
39.1 °
39.1 °
19 %
3.6kmh
20 %
Sun
40 °
Mon
40 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments