पुणे : पुणे-कोलाड महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएने निर्णायक पावले उचलली असून भूगाव बायपास प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वतः पुढाकार घेत या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यावर भर दिला असून, लवकरच काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भूगाव परिसरातील वाहतूक कोंडी हा गेल्या काही वर्षांपासूनचा गंभीर प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित बायपास मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, तो कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुख्य रस्त्यावरचा ताण कमी होऊन पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकतीच भूगाव बायपासच्या नियोजित मार्गाची पाहणी करत प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा आढावा घेत त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हा बायपास मार्ग पीएमआरडीए आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केला जाणार आहे. पाहणीदरम्यान डॉ. चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून भूसंपादन प्रक्रियेबाबत त्यांच्या शंका दूर केल्या. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामाचे आदेश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केवळ भूगावपुरतेच नव्हे, तर वाघोली, शिक्रापूर, चाकण आणि लोहगाव या भागांतील प्रलंबित पायाभूत प्रकल्पही मार्गी लावण्यावर पीएमआरडीएचा भर आहे. झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, या उपनगरांना जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
भूगाव बायपास मार्ग सुरू झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, तसेच प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.


