39.9 C
New Delhi
Thursday, June 11, 2026
HomeTop Five News'म्हाडा’ची २९५ घरांसाठी संधी

‘म्हाडा’ची २९५ घरांसाठी संधी

४ मेपासून अर्ज, ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर वाटप

पुणे : घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाकडून दिलासादायक योजना जाहीर करण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने विविध भागांतील एकूण २९५ सदनिकांच्या विक्रीची घोषणा केली असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ४ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी आणि सदनिका निवड प्रक्रिया सुरू होणार आहे.

या विशेष योजनेत पुणे महानगरपालिका हद्दीतील ११३ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १८२ अशा एकूण २९५ घरांचा समावेश आहे. १आरके, १बीएचके आणि २बीएचके प्रकारातील ही घरे २० टक्के सर्वसमावेशक आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील शिल्लक सदनिकांमधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. चिखली, वाकड, हडपसर, बालेवाडी आणि वाघोली यांसारख्या विकसित भागांतील प्रकल्पांचा यात समावेश असल्याने इच्छुकांना पसंतीनुसार घर निवडण्याची संधी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, इच्छुकांनी अधिकृत पोर्टलवरील माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सदनिका निश्चित केल्यानंतर ४८ तासांच्या आत एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक राहणार आहे. निर्धारित वेळेत ही रक्कम न भरल्यास संबंधित अर्जदाराचा हक्क रद्द होऊन सदनिका पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.

या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी २०,००० रुपये अनामत रक्कम आणि ७०८ रुपये अर्ज शुल्क (जीएसटीसह) असा एकूण २०,७०८ रुपयांचा प्रारंभिक भरणा निश्चित करण्यात आला आहे. तसेच अर्जदारांनी मागील दोन आर्थिक वर्षांतील (२०२४-२५ आणि २०२५-२६) उत्पन्नाचा अधिकृत पुरावा सादर करणे अनिवार्य राहणार आहे.

संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे पार पडणार असल्याने कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांपासून सावध राहावे, असा इशाराही मंडळाकडून देण्यात आला आहे. यशस्वी अर्जदारांना संबंधित गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व स्वीकारावे लागणार असून, मालमत्ता कर आणि देखभाल शुल्काची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे.

अधिक माहितीसाठी आगरकर नगर येथील गृहनिर्माण मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. या योजनेमुळे पुणे आणि परिसरातील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
39.9 ° C
39.9 °
39.9 °
19 %
2.6kmh
0 %
Wed
40 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
41 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments