- Ashadhi wari News | पंढरपूर, : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (cm fadanvis)
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने, सौ. प्रभावती बाबासाहेब माने यांच्यासमवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. (ashadhi wari)

मागील काळात सुरू केलेले मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात. येथे अत्यंत कमी जागा आहे. आता मोठी जागा तयार करणे गरजेचे आहे. यावर्षी हे काम सुरू करायचे आहे. कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “यावेळी वारीने एक नवा उच्चांक गाठला आहे. यावर्षी २५ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची दर्शनासाठी रांग लागली होती. परंतु दर्शनासाठी २५ तास लागले तरीही कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेत आहेत. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा, विष्ठा आदी संपूर्ण स्वच्छता झाली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आपण सर्वजण करत असलेली सेवा श्री विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल, अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो.” (pandharpur)
“लाखो भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात. अनेक वारकरी कळसाच्या दर्शनावरच समाधान मानतात. जणू काही विठुरायाचीच भेट झाली आहे, अशा भावनेने लोक जातात. या अनोख्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे ही देखील एक पर्वणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून केलेली ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीने केलेली पूजा आहे,” असेही ते म्हणाले. (ashadhi ekadashi)
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील आहे. विठुरायाची सेवा जरी आपल्याला करता आली नाही, तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तरी ती सेवा विठुरायापर्यंत पोहोचते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडावे यासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. “श्री विठ्ठल मंदिराला पाठबळ देणे, निधी देणे आणि विकास करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आज विठुमाऊलीच्या दर्शनासाठीच्या रांगेचे अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे. दर्शन रांगेत ५० ते ६० हजार वारकरी असले तरी पालकमंत्र्यांनी राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या सुविधा केल्यामुळे दर्शन सुसह्य झाले आहे,” असे ते म्हणाले.
शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. गौरगाव, ता. कळंब, जि. धाराशिव येथील बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती माने या दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत एसटी प्रवास पास मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी, वृक्षसंवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश देण्यात आला.


