पुणे- :”आयुष्यभर तर्कशुद्ध विचार, ठाम भूमिका तसेच प्रखर राष्ट्रनिष्ठा जपणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या विचारांची कास आजच्या तरुणाईने धरली पाहिजे. बदलत्या सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात टिळकांचे हेच तत्त्वज्ञान तरुणांना योग्य दिशा दाखवणारे आणि मौलिक ठरणारे आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी केले.
येथील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक चव्हाण होते.
आपल्या व्याख्यानात डॉ. गणेश चव्हाण पुढे म्हणाले की, “लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ ही घोषणा देऊन भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरला नाही, तर शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक संघटन यांच्या माध्यमातून जनजागृती केली. आजच्या डिजिटल युगात तरुणांनी अफवा व अपप्रचाराला बळी न पडता सत्य, तर्क आणि राष्ट्रहिताचा विचार करून आपली भूमिका मांडायला हवी. शिक्षणातूनच स्वाभिमानी आणि कर्तबगार पिढी घडते, यावर टिळकांचा गाढ विश्वास होता. त्यामुळे भावी शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. दीपक चव्हाण यांनी लोकमान्य टिळकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या प्रगाढ संशोधक वृत्तीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “लोकमान्य टिळक हे केवळ राजकीय नेते किंवा जननायक नव्हते, तर ते उच्च दर्जाचे गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि संस्कृतचे विद्वान संशोधक होते. मंडालेच्या तुरुंगातील प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ‘गीतारहस्य’ आणि ‘द आर्क्टिक होम इन द वेदाज’ यांसारख्या अजरामर ग्रंथांचे लेखन केले. आजच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी टिळकांची हीच चिकाटी, सखोल अभ्यासाची सवय आणि संशोधक वृत्ती अंगी बाणवणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि भावी शिक्षक (विद्यार्थी-शिक्षक) मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा वारे यांनी केले, तर पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. दीपक चव्हाण यांनी केले. वक्त्यांच्या ओघवत्या आणि विचारप्रवर्तक व्याख्यानाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी
RELATED ARTICLES
New Delhi
light rain
34.3
°
C
34.3
°
34.3
°
50 %
5kmh
81 %
Fri
34
°
Sat
36
°
Sun
35
°
Mon
39
°
Tue
37
°


