39.9 C
New Delhi
Thursday, June 11, 2026
HomeTop Five News१ मे पासून ‘मिसिंग लिंक’ खुली

१ मे पासून ‘मिसिंग लिंक’ खुली

मुंबई–पुणे प्रवास अर्ध्या तासाने जलद

मुंबई : बहुप्रतीक्षित मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास पोहोचला असून १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून, त्यानंतर ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या लोकार्पण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. खोपोली परिसरातील बोगद्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) खोपोली ते कुसगाव दरम्यान सुमारे १३.३ किलोमीटर लांबीची पर्यायी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला होता. यालाच ‘मिसिंग लिंक’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वळणावळणाचा आणि धोकादायक मार्ग टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

या प्रकल्पाची सुरुवात २०१९ मध्ये दोन टप्प्यांत करण्यात आली होती. मूळ नियोजनानुसार २०२१ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि विलंबामुळे प्रकल्प रखडला. तरीही गेल्या काही महिन्यांत कामाला गती देत एप्रिल २०२६ अखेर १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात आंतरराष्ट्रीय परिस्थितीचाही परिणाम जाणवला. विशेषतः डांबराच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण झाल्याने कामावर परिणाम झाला होता. तरीही एमएसआरडीसीने आवश्यक संसाधने उपलब्ध करून वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला. आता सर्व तांत्रिक आणि वजन चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोणत्याही परिस्थितीत १ मेचा मुहूर्त साधायचा, हे आमचे उद्दिष्ट होते. मोठ्या प्रयत्नांनंतर प्रकल्प पूर्ण झाला असून आता लोकार्पणासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे.”

ही मार्गिका सुरू झाल्यानंतर केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर महामार्गावरील वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि सप्ताहांताला होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होईल.

एकूणच, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून, राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
39.9 ° C
39.9 °
39.9 °
19 %
2.6kmh
0 %
Wed
40 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
41 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments