34.6 C
New Delhi
Sunday, July 19, 2026
HomeTop Five Newsपुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांच्यावर राष्ट्रवादीचा विश्वास

पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांच्यावर राष्ट्रवादीचा विश्वास

पक्षांतर्गत नाराजीची चर्चा

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेल्या विक्रम काकडे यांच्या निवडीमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चांनाही सुरुवात झाली आहे.

उमेदवारी निश्चित करण्यासाठी रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे कार्यालयात वरिष्ठ नेत्यांची दीर्घ बैठक पार पडली. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत विविध नावांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महायुतीतील जागावाटप प्रक्रियेनंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. त्यानंतर संभाव्य उमेदवारांच्या नावांवर पक्षात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. अखेर वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतर विक्रम काकडे यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला.

या प्रक्रियेत पार्थ पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच महायुतीतील समन्वयाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंतर उमेदवारी निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे.

विक्रम काकडे हे सामाजिक उपक्रमांमधील सहभागामुळे पुण्यात परिचित नाव मानले जाते. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध सामाजिक आणि जनसंपर्क उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात त्यांचा सहभाग आणि दीर्घकालीन पक्षनिष्ठा याबाबत काही कार्यकर्त्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे दिसून येत आहे.

या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुक नेते प्रयत्नशील होते. विशेषतः सुनील टिंगरे यांच्या नावाची पक्षात जोरदार चर्चा होती. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील समीकरणे लक्षात घेता ते सक्षम उमेदवार ठरू शकतील, असा काही नेत्यांचा अंदाज होता.

दरम्यान, उमेदवारी प्रक्रियेत सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावाला पाठिंबा दिल्याची चर्चा असून, त्यानंतर उमेदवारीचा मार्ग अधिक मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.

विक्रम काकडे यांच्या निवडीमुळे पक्षातील काही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी न देता नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिल्याबाबत काही स्तरांतून प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला असला, तरी पक्षातील अंतर्गत समीकरणे आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यांची कसोटी या निवडणुकीत लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34.6 ° C
34.6 °
34.6 °
50 %
4kmh
100 %
Sun
34 °
Mon
36 °
Tue
30 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments