पुणे -: क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेने जुळवून घेणे आवश्यक असून, त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था (इकोसिस्टीम) उभारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘इंटरॅक्शन विथ स्टेकहोल्डर्स फॉर फॉर्मेशन ऑफ द ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब अँड फ्रंटियर टेक इन्स्टिट्यूट’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ‘मित्रा’चे दीपक करंजीकर, ॲलिकॉन कास्टअॅलॉयचे हर्ष गुणे, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोळकर, ॲक्टीन टेक्नॉलॉजीचे विकास महाजन, ब्रिगेडियर सचिन कालिया, स्ट्रॅटेजिक रिसर्च अँड ग्रोथ फाऊंडेशनचे वरुण खंदारे, सिम्बॉयसिसच्या कौशल्य अभिमत विश्वविद्यालयाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर)चे प्रसन्नजित फडणवीस, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, टाटा स्टील लिमिटेडचे माजी उपाध्यक्ष सी. आर. कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२४ मध्ये क्वांटम कंप्यूटिंगआणि डीप टेक तंत्रज्ञानाचा जागतिक बाजार सुमारे २ ते ३ ट्रिलियन डॉलर इतका होता. पुढील पाच वर्षांत तो १६ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मानवी इतिहासात इतक्या वेगाने वाढणारे तंत्रज्ञान यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. त्यामुळे या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक आहे.
ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या ‘फ्रंटियर टेक्नॉलॉजी इंडेक्स’मध्ये भारत सध्या ३६ व्या क्रमांकावर असला, तरी अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये त्याची गणना होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत या क्षेत्रात भारताने चांगली प्रगती केली आहे. मात्र, सध्या विविध स्तरांवर सुरू असलेले प्रयत्न विखुरलेले आहेत. त्यांचे संस्थात्मकीकरण केल्यास देशाच्या प्रगतीला अधिक गती मिळू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सिलिकॉन तंत्रज्ञान आणि
क्वांटम कंप्यूटिंग ही जग बदलणारी तंत्रज्ञाने असून, उद्योग-व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या बदलांशी जुळवून घेण्यासाठी मजबूत परिसंस्था उभारावी लागेल. अन्यथा आपण जागतिक स्पर्धेत मागे पडू. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) निधी, तांत्रिक क्षमता आणि कौशल्यांच्या अभावामुळे या तंत्रज्ञानाचा पुरेसा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सर्वांसाठी उपलब्ध असलेले स्मार्ट प्लॅटफॉर्म, सुविधा आणि सक्षम मनुष्यबळ विकसित करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र (ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब) बनविण्यासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार होणे आवश्यक असून, त्यासाठी या क्षेत्राला समर्पित स्वतंत्र संस्था उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने क्वांटम कंप्यूटिंग तंत्रज्ञानासाठी विविध योजना सुरू केल्या असून, राज्यातील प्रयत्न त्या योजनांशी सुसंगत राहणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘मित्रा’ संस्था या दिशेने काम करत असून, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि डीप टेक क्षेत्रासाठी प्रभावी धोरणात्मक चौकट तयार करण्यासाठी सर्व संबंधित संस्था आणि धोरणांचे संस्थात्मक एकत्रीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नवीन सुविधा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती गुंतवणूक करण्यास तयार आहे. ‘मित्रा’च्या माध्यमातून
क्वांटम कंप्यूटिंग प्रशिक्षक तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून, पुढील दोन ते तीन वर्षांत किमान पाच हजार जणांना या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
श्री.फडणवीस म्हणाले की, सध्या विविध स्तरांवर सुरू असलेले प्रयत्न एकत्र आणून त्यांचे संस्थात्मकीकरण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. मुंबईत विकसित होत असलेल्या ‘इनोव्हेशन सिटी’ प्रकल्पासाठी राज्य शासनाने टाटा समूहाशी भागीदारी केली असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. फ्रंटियर टेक इन्स्टिट्यूटचा हा उपक्रम आणि इनोव्हेशन सिटीची संकल्पना परस्परपूरक असल्याने या दोन्ही उपक्रमांमध्ये समन्वय साधून काम करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञांनी क्वांटम कंप्यूटिंग तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील संधी, संशोधन, उद्योग आणि कौशल्य विकास या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्ष गुणे यांनी केले.


