37 C
New Delhi
Sunday, July 19, 2026
Homeमनोरंजन'इठा' चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड

‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड

विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या लोककलांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचे जीवन, संघर्ष आणि कलाप्रवास हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनाशी संबंधित कोणत्याही चित्रपटात ऐतिहासिक सत्यता, कुटुंबीयांच्या भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर राखला जाणे आवश्यक आहे. मात्र आगामी ‘इठा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप विठाबाई नारायणगांवकर यांचे नातू व राज्य शासनाच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी विठाबाई नारायणगावकर यांचे नातेवाईक, विविध सामाजिक, सांस्कृतिक व तमाशा क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धनंजय खुडे म्हणाले की, चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून त्यामधून सादर होणारी माहिती समाजासाठी इतिहासाचा संदर्भ बनत असते. त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा इतिहास काल्पनिक स्वरूपात किंवा वस्तुस्थितीपासून दूर जाऊन सादर होणार नाही, याची काळजी घेणे ही निर्माते व दिग्दर्शकांची नैतिक जबाबदारी आहे. चित्रपट निर्मात्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करावी, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करावा आणि विठाबाई नारायणगांवकर यांच्या कार्याला व इतिहासाला न्याय मिळेल, अशी भूमिका घ्यावी, अशी आमची ठाम मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धनंजय खुडे यांनी सांगितले की, तमाशा महर्षी कै. शाहीर पठ्ठे बापुराव (श्रीधर कृष्ण कुलकर्णी ) यांचे एकमेव गंडाबंधन शिष्य (बापूसाहेब खुडे) असून त्या काळी त्यांच्या कडून तमाशाचे धडे घेतल्या नंतर भाऊ बापू (मांग) नारायणगांवकर या नावाने स्वातंत्र्य पूर्व इ.सन १९३० ते १९३२ या कालावधीत तमाशा मंडळाची स्थापना केली होती. भाऊसाहेब खुडे हे बापुसाहेबांचे सख्खे चुलते होते. शाहीर पठ्ठे बापूराव व पवळा या त्याकाळच्या तमाशातील जोडी नंतर या काका-पुतण्याच्या (भाऊ बापू) जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात तमाशा कलेला लोकाश्रय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. या तमाशा फडाला नंतर मात्र चित्रपटाच्या टीझरमध्ये “भाऊ गावकर तमाशा मंडळ” असा चुकीचा उल्लेख करण्यात आला असून, प्रत्यक्षात त्याचे नाव “भाऊ बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ” असे होते. तसेच राष्ट्रपती पदक स्वीकारण्याचा दाखविलेला प्रसंगही वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्या नुसार, १९६१ साली बापूसाहेब खुडे नारायणगांवकर यांना स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते दिल्ली येथील राष्ट्रपती भवना मध्ये राष्ट्रपती सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले होते. या मूळ इतिहासाशी छेडछाड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. तसेच चित्रपटाचे नावही बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती करताना संपूर्ण कुटुंबीयांची संमती घेणे आवश्यक होते. मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा आरोपही धनंजय खुडे यांनी केला. लोककलेच्या परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि भविष्यात कोणताही तमाशा या लोककला संदर्भात समाजात गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी चित्रपटात आवश्यक ते बदल करावेत; अन्यथा चित्रपट निर्माते व संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, त्याच बरोबर तिव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन देखील कारण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
37 ° C
37 °
37 °
33 %
3.9kmh
95 %
Sun
39 °
Mon
37 °
Tue
30 °
Wed
34 °
Thu
33 °

Most Popular

Recent Comments