36.4 C
New Delhi
Saturday, August 1, 2026
HomeBlogलोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे; अजीत डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

अजित डोवाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, – : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तथा पुरस्काराचे मानकरी अजित डोभाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक आदी उपस्थित होते.

अमित शाह म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजविली. ‘केसरी’ आणि ‘द मराठा’ या वृत्तपत्रांद्वारे निर्भीड पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला, तर राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून देशभक्त नागरिक घडविण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करतांना श्री. शाह म्हणाले, देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेला बळकटी देण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि निर्णायक बनविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड अत्यंत योग्य असून त्यांच्या कार्यातून देशातील तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोवाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे. २०१४ पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे परिमाण दिले. त्यांच्या ‘प्रोॲक्टिव्ह डिटरन्स’ च्या संकल्पनेमुळे भारताची सुरक्षा रणनीती अधिक प्रभावी झाली आहे. भारत आता केवळ हल्ले सहन करणारा देश नसून आवश्यकतेनुसार ठोस प्रत्युत्तर देण्याची क्षमता असलेले सामर्थ्यवान राष्ट्र बनल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकमान्य टिळकांनी १८५७ नंतर भारतीय समाजात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना चेतवून राष्ट्रवादाला नवी दिशा दिली, ते भारतीय राष्ट्रवादाचे जनक होते. टिळकांनी इंग्रजी साम्राज्याच्या काळात भारतीयांची मानसिकता बदलत त्यांच्या मनात देशभक्तीच्या भावनेचे रोपण केले. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणत राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रहितासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तीलाच लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे उचित असून अजित डोवाल हे त्या परंपरेला साजेसे व्यक्तिमत्त्व असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे-अजित डोवाल

पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लोकमान्य टिळकांचे राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाजजागृती आणि विचारप्रबोधनाचे कार्य आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. हा पुरस्कार स्वीकारणे हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्य ही सहज मिळालेली देणगी नसून असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून प्राप्त झालेली अमूल्य संपत्ती असल्याचे सांगत त्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हा संदेश आजच्या काळात विकसित भारताच्या राष्ट्रीय संकल्पात रूपांतरित करण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रहित हे सर्वांत सर्वोच्च मानून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. युवकांनी लोकमान्य टिळकांचे विचार आणि ‘गीतारहस्य’चा अभ्यास करून समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वराज्याचा विचार आज राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीत अधिक प्रभावीपणे प्रतिबिंबित होत असल्याचे सांगितले. देशाच्या सीमा, अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर व्यवस्थेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यात अजित डोवाल यांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांना मिळालेला पुरस्कार देशाच्या सुरक्षा यंत्रणा, सशस्त्र दल आणि राष्ट्रसेवेला वाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची गौरवशाली परंपरा राष्ट्रभक्ती, साहस, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारी असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा नसून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचाही सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून गृहमंत्री अमित शाह आणि अजित डोवाल यांच्या योगदानामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा, सीमासुरक्षा आणि दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. भारतीय पोलीस सेवा, गुप्तचर व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून विविध आव्हानात्मक परिस्थितीत प्रभावी नेतृत्व करत अजित डोवाल यांनी राष्ट्रसेवेत दिलेले योगदान देशासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. रोहित टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. १९८६ मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला सुरुवात करण्यात आली असून राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. श्री. डोवाल यांना देशाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या बहुमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
36.4 ° C
36.4 °
36.4 °
43 %
5.1kmh
99 %
Sat
36 °
Sun
37 °
Mon
40 °
Tue
33 °
Wed
32 °

Most Popular

Recent Comments