MarathiNews | मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या ‘सैराट’ चित्रपटातून ‘सल्या’ ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर मोठा दुःखाचा आघात झाला आहे. त्यांचे वडील अस्लम शेख यांचे दीर्घ उपचारानंतर निधन झाले असून, या घटनेमुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही त्यांना मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.(ArbazShaikh)
माहितीनुसार, अस्लम शेख यांच्यावर गेल्या महिनाभरापासून मेंदूशी संबंधित गंभीर आजारावर उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांना सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांकडून सातत्याने उपचार सुरू होते. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाज शेख यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.(TrendingNews)
या काळात अरबाजने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत “मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे,” अशी आर्त हाक दिली होती. त्याच्या या आवाहनानंतर चाहत्यांनी आणि अनेक सामाजिक संघटनांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता.(SairatFame)
दरम्यान, उपचार सुरू असताना संबंधित खासगी रुग्णालयाकडून वारंवार अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करत अरबाजने आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित रुग्णालयाच्या मेडिकलवर कारवाई केली होती.
यानंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत शेख कुटुंबाला मदत केली. अस्लम शेख यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवून पुढील उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न केले, मात्र उपचारांना अपेक्षित यश मिळाले नाही आणि अखेर त्यांचे निधन झाले.
‘सैराट’मधील भूमिकेमुळे लोकप्रिय ठरलेला अरबाज शेख आज विविध माध्यमांतून सक्रिय आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या प्रेयसीसोबत विवाह केला होता आणि वैवाहिक आयुष्य आनंदात सुरू असतानाच वडिलांच्या निधनामुळे त्याच्यावर मोठे वैयक्तिक दुःख ओढवले आहे. या घटनेनंतर चाहते आणि कलाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.


