Politics News | निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या अधिकृत यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. पिपाणी चिन्हावर शरद पवारांनी याआधीच तीव्र आक्षेप घेतला होता. हे चिन्ह गोठवण्याची मागणी त्यांच्या गटाकडून सातत्याने करण्यात येत होती आणि अखेर आयोगाने ती मान्य केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जारी केलेल्या अधिकृत चिन्ह यादीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ‘मशाल’ आणि शरद पवार गटाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही चिन्हे कायम ठेवण्यात आली आहेत. त्याच यादीतून पिपाणी चिन्ह हटवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते. तुतारीशी साधर्म्य असलेल्या या चिन्हामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पिपाणी चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा केला होता.
साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या पराभवाला याच गोंधळाला जबाबदार धरण्यात आले होते. तसेच विधानसभा निवडणुकीतही पिपाणी–तुतारी चिन्हांच्या साधर्म्यामुळे ९ मतदारसंघांत शरद पवार गटाला नुकसान झाले, अशी चर्चा झाली होती.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक करत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
“निवडणूक चिन्हातून पिपाणी वगळल्याबद्दल आयोगाचे आभार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा मोठा फटका बसला. हा निर्णय तेव्हाच घेतला असता तर आजचं चित्र वेगळं असतं. असो, देर आए दुरुस्त आए!” असे ते एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले.


