11.1 C
New Delhi
Thursday, January 22, 2026
HomeTop Five Newsमहानगरपालिका म्हणजे कमिशनचा धंदा नाही!

महानगरपालिका म्हणजे कमिशनचा धंदा नाही!

देवेंद्र फडणवीसांचा नगरसेवकांना दिला कानमंत्र

Political News | पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Mahapalika Result) भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना थेट शब्दांत इशारा दिला आहे. “हा पुणेकरांनी दिलेला आतापर्यंतचा सर्वांत मोठा कौल आहे. पण पदासाठी वाद, गटबाजी किंवा (Devendra Fadanavis) चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणी कितीही मोठा असला तरी महापालिकेत गैरप्रकार सहन केला जाणार नाही,” असा कानमंत्र दिला आहे.

पुण्यातील सर्व नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांच्या अभिनंदनासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच भाजपचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “पुण्यात भाजपने इतिहास रचला आहे. गेल्या 30–35 वर्षांत कुठल्याही पक्षाला इतकं प्रचंड बहुमत मिळाल्याचं मी पाहिलेलं नाही. पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. माध्यमांमध्ये लढत चुरशीची असल्याचं दाखवलं जात होतं, पण आपल्या कार्यकर्त्यांनी ती एकतर्फी केली.”

या विजयाकडे केवळ राजकीय यश म्हणून न पाहता जबाबदारी म्हणून पाहण्याचा सल्ला देताना ते म्हणाले, “इतकं मोठं बहुमत मिळालं की आनंद होतो, पण त्याच वेळी जबाबदारीही प्रचंड वाढते. पुणेकरांनी मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिलं आहे. जर त्यांच्या विश्वासाला आपण पात्र ठरलो, तर पुढची 25 वर्षं आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. पण जर आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर हा विजय लाटेसारखा निघून जाईल.”

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि विविध समित्यांच्या नियुक्त्यांबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पद कोणाला यावर्षी मिळेल, कोणाला पुढच्या वर्षी मिळेल, यापेक्षा पुणेकरांनी दिलेला बहुमताचा कौल महत्त्वाचा आहे. पदासाठी खेचाखेची झाली, तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला.

महानगरपालिकेतील कारभाराबाबत त्यांनी थेट भाष्य केलं. “महापालिका हा कमिशनचा धंदा नाही. हा आपला व्यवसाय नाही. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी आपल्याला दिलेली जबाबदारी आहे. पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार हीच आपली ओळख असली पाहिजे.”

आनंदाच्या क्षणीच कडवट सत्य सांगणं योग्य असतं, असं सांगत फडणवीस म्हणाले, “महापालिकेत उन्माद, अहंकार किंवा अपारदर्शकता मी सहन करणार नाही. जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठा कोणी नाही. जर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसाल, तर त्या खुर्चीवर बसण्याचा आपल्याला अधिकार नाही.”

पुण्याच्या विकासाबाबत ठोस दिशादर्शन करत त्यांनी सांगितलं की, “पुणेकरांना दिलेली आश्वासने पुढील दोन वर्षांत प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात दिसली पाहिजेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. पुणे देशातील नंबर एक महापालिका झाली पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी एकदिलाने काम केलं पाहिजे.”

भाजपला मिळालेल्या या प्रचंड विजयामुळे पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. पण हा अध्याय विकासाचा ठरेल की वादाचा, हे आता नवनिर्वाचित नगरसेवकांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला हा इशारा म्हणजे सत्तेबरोबरच जबाबदारीही तितकीच मोठी आहे, याची आठवण करून देणारा स्पष्ट संदेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
11.1 ° C
11.1 °
11.1 °
87 %
0kmh
0 %
Wed
15 °
Thu
25 °
Fri
19 °
Sat
18 °
Sun
19 °

Most Popular

Recent Comments