पुणे : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचे स्पष्ट चित्र समोर आणले आहे. या निकालांत महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विरोधकांना जबर धक्का दिला आहे. भाजपने १२० जागा जिंकत ‘सेच्युरी’ पार केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५४ जागांवर विजय मिळवत आपली ताकद कायम राखली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४० जागा जिंकत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्वतःचे स्थान मजबूत केले आहे. या तिन्ही पक्षांची मिळून असलेली कामगिरी राज्यात महायुतीचा बोलबाला असल्याचे स्पष्टपणे दर्शवते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेहमीच जनतेचा मूड दर्शवणाऱ्या मानल्या जातात. आजच्या निकालांनी भाजपची संघटनात्मक क्षमता, बूथ व्यवस्थापन आणि सत्तेतील निर्णयक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात भाजपचा प्रभाव वाढताना दिसत असून, १२० जागांचा आकडा हा केवळ विजय नसून आगामी निवडणुकांसाठी दिलेला राजकीय संदेश आहे. भाजपनंतर शिवसेना (शिंदे गट) ने ५४ जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. शिवसेनेतील फूटीनंतर या गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, या निकालांनी शिंदे गटाने आपला स्वतंत्र जनाधार टिकवून ठेवल्याचे आणि सत्तेतील सहभागाचा मतदारांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दाखवून दिले आहे. महायुतीतील भाजप–शिवसेना समन्वय हा सध्या तरी प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.या निवडणुकांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणे ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. शरद पवारांपासून वेगळी वाट चोखाळल्यानंतर अजित पवार गटाची ताकद काय, याबाबत संभ्रम होता. मात्र, या निकालांनी अजित पवार राष्ट्रवादी ही महायुतीतील निर्णायक शक्ती ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे.दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निवडणुकांत मोठ्या प्रमाणात पिछाडी सहन करावी लागली आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ७ जागा, उद्धव ठाकरे गटाला ८ जागा, तर काँग्रेसला ३४ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय इतर पक्ष व अपक्षांनी मिळून २३ जागा जिंकल्या आहेत. ही आकडेवारी महाविआतील विसंवाद, नेतृत्वाचा गोंधळ आणि संघटनात्मक कमकुवतपणाचे प्रतिबिंब मानली जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, महाविकास आघाडीतील पक्षांना स्थानिक पातळीवर एकत्रितपणे लढण्यात अपयश आले. एकसंध प्रचाराचा अभाव, परस्परांवरील अविश्वास आणि ठोस नेतृत्वाचा अभाव याचा थेट फटका मतदारांमधून बसल्याचे दिसते. विशेषतः शरद पवार गट आणि उबाठा गटाची अत्यल्प कामगिरी ही त्यांच्या राजकीय भविष्यासाठी चिंतेची बाब ठरते. या निकालांचा सर्वांत महत्त्वाचा राजकीय संदर्भ म्हणजे येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुका. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे हे निकाल म्हणजे महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. सध्याचे वारे महायुतीच्या बाजूने वाहताना दिसत असले, तरी महानगरपालिका निवडणुकांत शहरी प्रश्न निर्णायक ठरणार आहेत.
वाहतूक, पाणीपुरवठा, घरबांधणी, स्वच्छता, रोजगार आणि महागाई हे मुद्दे शहरातील मतदारांसाठी महत्त्वाचे असतील. त्यामुळे आजचा विजय अंतिम समजून चालणार नाही, याची जाणीव महायुतीला ठेवावी लागेल. मात्र, सध्या तरी मतपेटीतून मिळालेला कौल महायुतीच्या बाजूने झुकलेला आहे, हे नक्की.एकूणच, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हे राज्याच्या राजकारणातील बदलते समीकरण स्पष्ट करणारे ठरले आहेत. महायुतीचा वाढता प्रभाव आणि महाविकास आघाडीची घसरण यामुळे आगामी काळातील राजकीय लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.


