मुंबई – राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पहिल्या टप्प्यातील मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. विशेष म्हणजे, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्ण होण्यापूर्वीच राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.
मुंबईत निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यामुळे मुंबईसह ठाणे, पुणे, आदी महापालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी 23 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 23 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकूण 46 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त यांच्या 10 डिसेंबरच्या आदेशानुसार आणि कोकण भवन विभागीय आयुक्तांच्या 12 डिसेंबर 2025 च्या प्राप्त यादीनुसार महापालिका आयुक्तांनी या नियुक्त्या केल्या आहेत. मतदानासंबंधीत आणि अनुषंगिक कामांचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
या नियुक्त्यांमुळे आगामी महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. याचा अर्थ लवकरच महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असल्याचे समजते.


