– सर्वसामान्य नागरिकांनी गैरसोय होता कामा नये
– फ क्षेत्रीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक
पिंपरी-चिंचवड – शहरातील सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने पूर्णत्वाला जातील याची खबरदारी घ्या. मूलभूत विकास कामांना प्राधान्य द्या. रहदारीचे रस्ते, अतिक्रमण सांडपाणी निचरा यासारख्या मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांच्या समस्या असतील तक्रारी येत असतील, तर तातडीने यांचा निपटारा होईल याची काळजी घेण्याची सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या फ प्रभाग कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा शुक्रवारी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, भाजपा सरचिटणीस अजय पाताडे, प्रभाग अध्यक्ष संतोष ठाकूर, घरकुल फेडरेशनचे सुधाकर धुरी, युवराज निलावर, नगररचना अधिकारी प्रमोद गायकवाड, व्ही. के वायकर, पाणीपुरवठा, स्थापत्य, आरोग्य यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, एप्रिल महिना सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टंचाई बाबत उपाय योजना तातडीने अमलात आणणे गरजेचे आहे. भोसरी मतदारसंघात येणाऱ्या उपनगरीय भागांमध्ये पाणीटंचाई बाबत कोणत्याही समस्या नागरिकांना भेडसावणार नाहीत याची काळजी घ्यावी. याचबरोबर मान्सूनपूर्व कामांचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वा-यामुळे झाडे पडणे अशा दुर्घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. अशाही सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या.
**
क्षेत्रीय कार्यालयांचा थेट संबंध नागरिकांच्या रोजच्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी येत असतो. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांनी नागरिकांच्या प्रत्येक समस्येचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे आमची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे प्रभाग कार्यालयाला सूचना करण्यात आल्या. उन्हाळा आणि मान्सूनपूर्वक कामे या अनुषंगाने तातडीने आराखडा तयार केला जावा असे देखील सांगण्यात आले आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.