मुंबई : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यानंतर आता राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला असून, EVM आणि बॅलेट मशीनवर उमेदवारांच्या नावांचा क्रम बदलण्यात आला आहे. यापुढे उमेदवारांची नावे ठरावीक गटांनुसार लावण्यात येणार असून, यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शी होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ग्रामविकास विभागाने याबाबत अधिकृत राजपत्र (गॅझेट) अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील संबंधित तरतुदींनुसार (कलम २७४ चे पोट-कलम २ चे खंड १२ व १३ तसेच कलम ५७ चे पोट-कलम २ व ३) राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
आधी काय होते?
यापूर्वी EVM किंवा बॅलेट पेपरवर उमेदवारांची नावे मराठी वर्णमालेनुसार आडनावाच्या क्रमाने छापली जात होती. या पद्धतीमुळे अनेक वेळा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार यादीत खाली जात होते, तर अपक्ष किंवा लहान पक्षांचे उमेदवार वर दिसत होते. त्यामुळे काही मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
आता काय बदल झाला?
नव्या नियमांनुसार उमेदवारांची नावे चार गटांमध्ये विभागून EVM आणि बॅलेट मशीनवर दर्शवली जाणार आहेत. हा बदल महाराष्ट्र पंचायत समित्या नियम, १९६२ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार लागू करण्यात आला आहे.
नवीन गटवारी पुढीलप्रमाणे असेल —
पहिला गट :
भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार.
दुसरा गट :
भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले, मात्र इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार (जे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत).
तिसरा गट :
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त (Unrecognized) राजकीय पक्षांचे उमेदवार.
चौथा गट :
अपक्ष (Independent) उमेदवार.
प्रत्येक गटातील उमेदवारांचा अंतर्गत क्रम मराठी वर्णमालेनुसार ठरवला जाईल. यामध्ये प्रथम आडनाव (आडनाव नसल्यास नाव), त्यानंतर उमेदवाराचे नाव आणि शेवटी पत्त्याचा विचार केला जाणार आहे.
EVM वर अशी दिसतील नावे
– सर्वात वर : राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार
– त्यानंतर : इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार
– पुढे : अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार
– सर्वात शेवटी : अपक्ष उमेदवार
हा बदल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी लागू राहणार आहे. यामुळे मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार मतदारांना सहज ओळखता येतील आणि मतदान प्रक्रिया अधिक सुसूत्र होईल, असे ग्रामविकास विभागाचे म्हणणे आहे.
राज्य सरकारने हे नियम तातडीने लागू करण्यासाठी पूर्वप्रसिद्धीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. या बदलामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला असून, उमेदवार आणि मतदारांनी नव्या नियमांची माहिती घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.


