33.1 C
New Delhi
Thursday, April 30, 2026
HomeTop Five Newsविद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे लोकार्पण

विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे लोकार्पण

पुण्यात तिन्ही स्तरांवर वाहतूक विकासाचे काम


पुणे- पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासनाने विविध पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य दिले असून शहरात वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण सुरू आहे. रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्यामुळे उड्डाण पूल, भुयारी मार्ग, ग्रेड सेपरेटर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार अशा विविध माध्यमातून वाहतूक सुलभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे तसेच पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विद्यापीठ चौकातील जुना उड्डाण पूल पाडून नवीन दुमजली उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते. मात्र सर्वांना विश्वासात घेऊन तसेच विविध पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजितदादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असे त्यांनी नमूद केले.

प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांकडून टीकाही झाली होती. मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात अजितदादा एका भाषणात म्हणाले होते की, आम्ही अभियंते नाही; परंतु अभियंत्यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे आमचे काम आहे. त्या भूमिकेतून त्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १ हजार ७६३ मीटर लांबीचा हा उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र सरकारकडून सुमारे ८० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्याचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळेल. महापौर मंजुषा नागपुरे यांनीही शहराच्या विकासासाठी हा उड्डाण पूल महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.

अजितदादांचा पाठपुरावा

या प्रकल्पाच्या निमित्ताने दिवंगत अजितदादांची आठवण प्रकर्षाने होत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, विद्यापीठासमोरील जुना पूल वाहतुकीसाठी अपुरा ठरत असल्यामुळे तो पाडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आधुनिक दुमजली उड्डाण पूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. करोनाच्या कठीण काळातही पुणेकरांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेत हा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आणि त्यामुळे तो विक्रमी वेगाने पूर्ण होऊ शकला.

उड्डाण पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याचा विचार

विद्यापीठ चौकातील या उड्डाण पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत अनेकांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
38 %
3.6kmh
40 %
Thu
36 °
Fri
39 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
41 °

Most Popular

Recent Comments