35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
HomeTop Five Newsशासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

पुणे : शासकीय अधिकाऱ्यांकडून चांगली साहित्य निर्मिती होण्यासाठी त्यांनी अधिकाधिक चांगले वाचन केले पाहिजे अशी अपेक्षा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मिलिंद भागवत, माजी सहकार आयुक्त अनिल कवडे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, गुजरातचे जीएसटीचे प्रधान आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन, राजीव नंदकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुलकुंडवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांमध्येसुद्धा प्रतिभेची कमतरता नाही. त्यांच्याकडे अनुभवाचेही संचित आहे. त्यांनी या सगळ्याला अधिक चांगल्या सकस वाचनाची जोड दिली पाहिजे. त्यातूनच अधिक दर्जेदार आणि उत्तम साहित्य निर्मिती होऊ शकतील.
शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन हे विचारांना स्फूर्ती देणारे संमेलन आहे असे गौरवोद्गार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी काढले.


निंबाळकर म्हणाले, दोन दिवस चाललेल्या या संमेलनात अनेक विषयांवर उहापोह करण्यात आला आहे. आपला देश विविध भाषा प्रांत यांनी नटलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांना या विविध भागांमध्ये काम करण्याची संधी मिळत असते. त्यांना ज्या ज्या भागात जाण्याची संधी मिळते त्यांनी त्या त्या ठिकाणच्या अनुभवांवर लेखन केले पाहिजे. विविध भाषांमधील पुस्तके देखील आपल्या भाषेत येणे गरजेचे आहे. मुलांनी मराठी भाषेतूनच शिक्षण घेणे गरजेचे आहे मात्र आजकाल स्टेटस सिम्बॉल म्हणून मुलांना इंग्रजी शाळेत टाकले जाते. परंतु हे बदल घडवण्याची सुरुवात शासकीय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनातून असे चांगले संदेश समाजापुढे जाणे आवश्यक आहे.
संमेलनाध्यक्ष मिलिंद भागवत यांनी दोन दिवस चाललेल्या संमेलनातील विविध उपक्रमांचा एकत्रित आढावा घेतला. या संमेलनातून आपण नेमके काय मिळवले याविषयी त्यांनी आपले विचार मांडले. हे संमेलन अधिक व्यापक स्वरूपात आपण पुढील वर्षी घेऊयात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अनिल कवडे म्हणाले, शासकीय सेवा हे समाजसेवेचे उत्तम असे माध्यम आहे. माणसांना सर्वाधिक पाहण्याची अनुभवण्याची संधी शासकीय अधिकाऱ्यांना मिळत असते. या संधीचा उपयोग आपण कसा करतो हे शेवटी महत्त्वाचे आहे. प्रतिभेचे भावनेचे प्रकटीकरण संमेलनातून जसे आवश्यक आहे तसे आत्मचिंतन सुद्धा गरजेचे आहे. आपण काय कमावले आणि काय गमावले हे सुद्धा पहायला हवे. त्या परीक्षणावर साहित्याच्या माध्यमातून आपल्याला नेमकेपणाने बोट ठेवता यायला हवे. प्रबोधनाचा मार्ग हा साहित्य निर्मितीतून जातो हे लक्षात ठेवून चांगले आचार विचार समाजात रुजवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.


चांगल्या पुस्तकांसाठी एक डिजिटल व्यासपीठ उभे करून शासकीय अधिकाऱ्यांना हवी असलेली पुस्तके वाचता किंवा ऐकता कशी येतील असा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण एकत्र येऊन काहीतरी चांगले करू शकतो हाच या संमेलनाचा मुख्य उपलब्धीचा भाग आहे.
राजीव नंदकर यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments