28 C
New Delhi
Friday, July 10, 2026
HomeTop Five Newsहापूसच्या भेसळीवर कडक कारवाईचा इशारा

हापूसच्या भेसळीवर कडक कारवाईचा इशारा

MANGO | कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर हापूसला योग्य दर मिळावा आणि आंब्याच्या नावाखाली होणारी भेसळ रोखावी, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत राजू शेट्टी यांनी थेट ‘आंबा पार्टी’चा इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना चे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, शहरात हापूसच्या नावाखाली अन्य आंब्यांची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित पुरवठादारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशा ठिकाणी रस्त्यावर आंबे ओतून निषेध म्हणून ‘आंबा पार्टी’ करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

हापूस आंब्याच्या प्रश्नावर कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी, बाजार समितीचे प्रतिनिधी आणि आडतदार यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि बाजारातील गैरप्रकारांना आळा बसावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या वेळी सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद, गणेश घुले आणि संतोष नांगरे यांच्यासह अनेक संचालक, आडतदार आणि आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

राजू शेट्टी यांनी सांगितले की, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात सुमारे ८० ते ९० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथे ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ या संकल्पनेतून विक्री सुरू करण्यात येणार असून, पुण्यातही अशीच योजना राबविण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आडतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या फळांना चांगला दर मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही बाजार समिती व आडतदारांनी दिली.

बैठकीतील प्रमुख मुद्दे

  • हापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजार आवारात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे.
  • आंब्यातील भेसळ रोखण्यासाठी प्रशासन व आडतदारांनी संयुक्त कारवाई करणे.
  • व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य आणि न्याय्य भाव देणे.
  • उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी उपाययोजना करणे.
  • किरकोळ विक्रेत्यांना भेसळ न करण्याबाबत कडक ताकीद देणे.

या बैठकीतून हापूस आंब्याच्या गुणवत्तेचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हित आणि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यामुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, बाजारपेठेत पारदर्शक व्यवहाराला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
76 %
2.2kmh
100 %
Thu
28 °
Fri
37 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
42 °

Most Popular

Recent Comments