पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ५ व्या राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका आरती झोटिंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हे संमेलन १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.(Marathi Sahitya Sammelan)
स्त्रीवादी आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या लेखनासाठी आरती झोटिंग यांची विशेष ओळख आहे. मनकवडा या काव्यसंग्रहासह त्यांनी पाच ग्रंथांचे लेखन केले असून त्यांच्या साहित्याला विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.(Pune Literary Event)
साहित्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात नुकतीच पुण्यात डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे, सुकाणू समिती सदस्य किशोर टिळेकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक दत्तात्रय भोंगळे, प्रदेश सरचिटणीस विक्रम शिंदे, सुनील लोणकर, सचिव अमोल कुंभार, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष ॲड. सुमेध गायकवाड, पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर, शहर सचिव बाळकृष्ण अमृतकर, संघटक योगेश चौधरी, कार्याध्यक्ष सिंधु साळेकर तसेच पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष शर्मिला गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. ग्रंथपूजनाने संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन आणि कविसंमेलन अशा विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरातील मोठ्या संख्येने साहित्यिक, कवी आणि रसिक या संमेलनात सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणारे हे १९७ वे मराठी साहित्य संमेलन असून मराठी साहित्यविश्वातील महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.


