पुणे, – दैनंदिन व्यवहारात नागरी सहकारी बँकांनी बदलत्या काळानुसार सर्वंकष बदल करणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात गुंतवणूकदारांबरोबरच कर्जदार देखील चिकित्सक झाला आहे, त्यामुळे विश्वासार्हता जपण्याबरोबरच बँकिंग साक्षरता वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे व्यक्त केले.
सहकार सुगंध आयोजित “बदलते बँकिंग” या परिसंवादात ते बोलत होते. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर लिखित “बँकिंग साक्षरता” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्यानिमित्ताने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, बुलडाणा क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, नॅफकबचे उपाध्यक्ष मिलिंद काळे, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि पुस्तकाचे लेखक गणेश निमकर व्यासपीठावर उपस्थित होते. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे आणि राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दृकश्राव्य माध्यमातून यावेळी शुभेच्छा दिल्या.
परिसंवादात बोलतांना मराठे पुढे म्हणाले की, सध्याच्या स्थितीमध्ये देशातील किमान 50 टक्के जनता बँकिंग क्षेत्रापासून दूर आहे. त्याचबरोबर आर्थिक साक्षरता वाढावण्याची गरज आहे. एकीकडे गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे, कर्ज व्यवहार देखील वाढत आहेत, तर दुसरीकडे व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहेत. या बदलत्या बँकिंगच्या दृष्टीने ग्राहकांमध्ये बँकिंग साक्षरता होणे आवश्यक असून त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. जिल्हा आणि नागरी सहकारी बँकेत काही संचालक वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. तर काही बँका या मुख्य कार्यकारी अधिकारीच चालवितात. नव्या लोकांना आणि विशेषत: तरुणांना सहकारात काम करण्यास वाव मिळावा, यादृष्टीने नागरी सहकारी बँकांमध्ये संचालकांना असलेला दोन टर्म कालमर्यादेचा कायदा योग्यच असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. केंद्र सरकारचे नियम सर्वच बँकांना बंधनकारक आहेत. नागरी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता स्वतंत्र फोरम देखील निर्माण केला आहे.
यावेळी डॉ. जोशी म्हणाले की, एकूणच बँकांची संख्या कमी करण्याचे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. तर नवीन बँक परवान्याबाबत नेमके धोरण अद्याप ठरलेले नाही. याबाबत सहकार मंत्रालयाने नव्याने अभ्यास गट नियुक्त केला असून त्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. निवडक मोठ्या काही पतसंस्थांचे रूपांतर नागरी बँकेमध्ये करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. सुमारे 2003 पासून नवीन बँकेला परवानगी मिळालेली नसल्याने परिणामी पतसंस्था वाढीस प्राधान्य मिळाले आहे. यावेळी चांडक म्हणाले की, यापुढील काळाची गरज लक्षात घेता सामाजिक बँकिंग क्षेत्र वाढविण्यावर जास्तीत जास्त भर देण्याची गरज आहे. या उपक्रमामुळे बँकिंग क्षेत्रातील ठेवी वाढण्यास मदत होणार आहे. आम्ही गेली अनेक वर्षे जाणीवपूर्वक हा प्रयत्न करीत आहोत.
यावेळी आयुक्त कवडे यांनी सांगितले की, सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खर्च कमी व्हावा असा प्रयत्न आहे. यासाठी डिजिटायझेशनवर अधिक भर देण्याची आम्ही योजना सुरु केली आहे. यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हता देखील वाढणार आहे. निवडणुकीसाठी इव्हीएम यंत्रणेचा वापर करावा यासाठी निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला आहे, यादृष्टीने निवडणूक प्राधिकरणाने नवीन सॉफ्टवेअर देखील तयार केले आहे. यावेळी काळे म्हणाले की, आजवर कॉसमॉस बँकेत 19 बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. जेथे व्यवसायिकदृष्ट्या चुकीचे निर्णय झाले होते, तेथील सहकारी बँकांचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण करुन घेतले आहे, मात्र जेथे भ्रष्ट मार्गांचा अवलंब झाल्याने बँक अडचणीत आली आहे, अशा बँका आम्ही घेतलेल्या नाहीत. विलिनीकरणाच्या माध्यमातून नवीन भागात शाखा विस्तार आणि व्यवसाय वाढीस मोठी संधी आहे. यावेळी ब्रम्हेचा म्हणाले की, सध्याच्या काळात बँकांसाठी नवीन परवाने मिळणे अवघड आहे, तर पतसंस्थांचे रूपांतर बँकेत करता येणे शक्य होणार आहे. याबाबत विविध पतसंस्थांबरोबर चर्चा सुरु आहे. यावेळी जुगादे यांनी सांगितले की, राज्याचे नवीन सहकार धोरण तयार होत असतांनाच सहकार कायदा देखील नव्याने तयार होत आहे. नवीन स्पर्धात्मक युगाचे भान, तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर आणि तरुणाईच्या सहकाराकडून अपेक्षा यांचा समावेश नव्या कायद्यात व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.यावेळी पुस्तकाचे लेखक निमकर यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विषद केली तर पुस्तकाचे प्रकाशक व सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. पुस्तकाच्या निर्मितीसाठी योगदान देणारे जयंत काकतकर, राजेंद्र पोतनीस, प्रमोद महाजन आणि प्रणिता महाजन यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सहकारी बँकांनी विश्वासार्हतेेबरोबरच बँकिंग साक्षरता वाढवण्याची गरज – सतीश मराठे
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
34.1
°
C
34.1
°
34.1
°
43 %
4.1kmh
40 %
Sun
34
°
Mon
38
°
Tue
41
°
Wed
43
°
Thu
42
°


