Helth news
पुणे : पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने २२ ते २८ जुलै या कालावधीत ‘महाआरोग्य सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, रक्तदान शिबिर तसेच विविध आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत महाआरोग्य सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात २२ जुलै रोजी ससून रुग्णालयाच्या नव्या ११ मजली इमारतीत सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणीही आरोग्य शिबिरे भरविण्यात येणार आहेत.
या अभियानाची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. येलप्पा जाधव आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
महाआरोग्य शिबिरात स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, नेत्र तपासणी व आवश्यक शस्त्रक्रिया, मुख कर्करोग तपासणी, हाडांची घनता (बीएमडी) तपासणी, हर्निया व स्थूलता तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय मधुमेह, हृदयविकार, असंसर्गजन्य आजार, पेलिएटिव्ह केअर, मानव दूध बँक आणि स्थूलता नियंत्रणासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेबाबत नागरिकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
२२ जुलै रोजी ससून रुग्णालयात पहिल्या शिबिरानंतर २४ जुलैला मंगळवार पेठ येथील शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रात, २६ जुलैला गाडीतळ (हडपसर) येथील सावित्रीबाई फुले शाळेत आणि २८ जुलैला शिरूर येथील घोडनदी परिसरातील नगरपरिषदेच्या मंगळ कार्यालयात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवा अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ससून रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
रक्तदानासाठी पुढे या
राज्यात अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या अभियानात विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी,” असे आवाहन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी केले.


