30.7 C
New Delhi
Tuesday, July 21, 2026
HomeTop Five Newsडेंग्यूविरुद्ध भारताला पहिली लस; 'क्यूडेंगा'ला डीसीजीआयची मंजुरी

डेंग्यूविरुद्ध भारताला पहिली लस; ‘क्यूडेंगा’ला डीसीजीआयची मंजुरी




४ ते ६० वर्षे वयोगटासाठी वापरास मान्यता


नवी दिल्ली, : भारतातील डेंग्यू प्रतिबंधाच्या लढ्यात मोठा टप्पा गाठला गेला असून, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांनी टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या ‘क्यूडेंगा’ (TAK-003) या डेंग्यू लसीला बाजारपेठेत वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतात डेंग्यू प्रतिबंधासाठी अधिकृत मान्यता मिळालेली ही पहिली लस ठरली आहे. ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींना ही लस देता येणार असून, लसीकरणापूर्वी डेंग्यू झाला आहे की नाही याची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारतात मागील दोन दशकांत डेंग्यूच्या नोंदवलेल्या रुग्णसंख्येत तब्बल ११ पट वाढ झाली आहे. २०२५ मध्ये देशात १.१३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. तज्ज्ञांच्या मते प्रत्यक्ष संसर्गाचा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण, हवामान बदल आणि डासांच्या वाढत्या प्रजननामुळे डेंग्यूचे संकट वर्षभर कायम राहू लागले आहे.


क्यूडेंगा ही टेट्राव्हॅलेंट, लाइव्ह-अटेन्युटेड लस असून, डेंग्यू विषाणूच्या चारही सेरोटाइप्सपासून संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. यापूर्वी डेंग्यूचा संसर्ग झाला असो किंवा नसो, ही लस दिली जाऊ शकते. दोन डोसच्या स्वरूपात ही लस त्वचेखाली दिली जाते. दोन्ही डोसांमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवावे लागते.
टाकेडाचे आंतरखंडीय बाजारपेठ प्रमुख डॉ. महेंद्र नायक यांनी सांगितले की, “भारतासारख्या डेंग्यूग्रस्त देशासाठी ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची आहे. सात वर्षांच्या अभ्यासातून या लसीने चारही प्रकारच्या डेंग्यू विषाणूंविरुद्ध दीर्घकालीन संरक्षण दिल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.”
कंपनीच्या माहितीनुसार, क्यूडेंगाला आतापर्यंत भारतासह ४३ देशांमध्ये नियामक मान्यता मिळाली आहे. सार्वजनिक आणि खासगी लसीकरण कार्यक्रमांद्वारे जगभरात ३.२ कोटींहून अधिक डोस वितरित करण्यात आले आहेत. ब्राझीलच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात आला असून अर्जेंटिना, कोलंबिया आणि इंडोनेशियामध्येही ती सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांत वापरली जात आहे.
या लसीच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेसाठी २८ हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर १९ क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. आठ देशांतील २० हजारांहून अधिक सहभागी असलेल्या ‘टाइड्स’ (DEN-301) या तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या अभ्यासात दुसऱ्या डोसनंतर डेंग्यूविरुद्ध ८०.२ टक्के परिणामकारकता, तर डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्यापासून ९०.४ टक्के संरक्षण आढळले. साडेचार वर्षांनंतरही रुग्णालयात दाखल होण्यापासून ८४.१ टक्के संरक्षण कायम असल्याचे निष्कर्षात दिसून आले.
भारतातील स्वतंत्र तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्येही ४ ते ६० वर्षे वयोगटातील मुलांपासून प्रौढांपर्यंत ही लस सुरक्षित, सहनशील आणि प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये क्यूडेंगाच्या वापराची शिफारस केली असून, लसीकरणापूर्वी तपासणी न करता सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमांमध्ये तिचा समावेश करण्यालाही समर्थन दिले आहे. या लसीला WHO ची पूर्व-पात्रता (Prequalification) देखील मिळाली आहे. त्यामुळे युनिसेफसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फतही तिची खरेदी शक्य झाली आहे.
डीसीजीआयकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात क्यूडेंगाच्या उपलब्धतेसाठी टाकेडा सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, नियामक संस्था आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसोबत समन्वय साधणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते, डास नियंत्रण, स्वच्छता, जनजागृती आणि प्रभावी लसीकरण यांचा एकत्रित वापर केल्यास भारतातील डेंग्यूचा वाढता धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
30.7 ° C
30.7 °
30.7 °
66 %
4kmh
95 %
Tue
33 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments