28.2 C
New Delhi
Tuesday, July 21, 2026
HomeTop Five Newsलोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवले जाणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवले जाणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

पुणे : देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित विशेष समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार वितरण समारंभ १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पुण्यातील गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर पार पडणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावणारे अजित डोवाल हे भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. २० जानेवारी १९४५ रोजी उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे त्यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६८ मध्ये ते भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) केरळ कॅडरचे अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांची गुप्तचर विभागात नियुक्ती झाली आणि देशातील संवेदनशील भागांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या.

मिझोराम, सिक्कीम, पंजाब आणि जम्मू-काश्मीरसारख्या आव्हानात्मक प्रदेशांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय काम केले. तसेच इस्लामाबाद आणि लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयांमध्येही त्यांनी राजनैतिक जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००५ मध्ये इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) संचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवी दिशा दिली.

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत अनेक निर्णायक घडामोडींमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पाकिस्तानविषयक धोरणातील बदल, डोकलाम सीमावादाच्या राजनैतिक तोडग्यातील सहभाग, तसेच भारत-चीन सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधी म्हणून केलेले कार्य यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष ओळख मिळाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि माजी राजदूत विजय गोखले यांच्यासह त्यांनी डोकलाम प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.

सेवाकाळात अजित डोवाल यांनी अनेक सन्मान पटकावले आहेत. केवळ सहा वर्षांच्या सेवेनंतर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळवणारे ते सर्वात तरुण अधिकारी ठरले. त्यानंतर विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तसेच शौर्यासाठीचा प्रतिष्ठेचा कीर्ती चक्र पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. कीर्ती चक्र प्राप्त करणारे ते पहिले पोलीस अधिकारी ठरले असून, ऑपरेशन ब्लॅक थंडर-२ मधील त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता.

याशिवाय विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या असून, उत्तराखंड गौरव सन्मान देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला बळकटी देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्यांची लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे डॉ. रोहित टिळक यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात असामान्य नेतृत्व, धाडसी निर्णयक्षमता आणि दीर्घकालीन सेवेमुळे अजित डोवाल यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून प्रदान करण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार हा त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मानाचा सन्मान ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
78 %
4kmh
99 %
Tue
33 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
34 °

Most Popular

Recent Comments