33.6 C
New Delhi
Thursday, June 18, 2026
Homeमनोरंजनएकच प्याला’ संगीत नाटकाचा मोफत प्रयोग

एकच प्याला’ संगीत नाटकाचा मोफत प्रयोग

ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना ‘कोहिनूर नाट्यरत्न पुरस्कार’


थोर मराठी नाटककार कै. राम गणेश गडकरी लिखित ‘एकच प्याला’ या शोकांतिका संगीत नाटकाचा प्रयोग मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. हा नाट्यप्रयोग सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान तर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरराज छोटा गंधर्व यांची १०८ वी जयंती १० मार्च रोजी असून त्यानिमित्त याचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात मराठी नाटक व चित्रपट क्षेत्रात अजरामर भूमिका केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना ‘कोहिनूर नाट्यरत्न पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ. सुचेता अवचट यांनी दिली. या मोफत नाट्यप्रयोगाचा लाभ रसिक प्रेक्षकांनी जरूर घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री नयना आपटे यांच्या मातोश्री कै. शांता आपटे यांनी १९५०-६० च्या दशकात अनेक भूमिका अजरामर केल्या होत्या. हा वारसा घेऊन नयना आपटे यांनी अनेक मराठी नाटके, संगीत नाटके आणि मराठी, हिंदी चित्रपटांत अनेक भूमिका अजरामर केल्या. अंमलदार, एकच प्याला, करायला गेलो एक, देव नाही देव्हाऱ्यात, नवरा माझ्या मुठीत, पुण्यप्रभाव, मानापमान, संशयकल्लोळ, लग्नाची बेडी अशी असंख्य मराठी नाटके आणि चुपके चुपके आणि मिली या हिंदी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

‘एकच प्याला’ हे थोर मराठी नाटककार राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांनी लिहिलेले एक अत्यंत लोकप्रिय व अजरामर शोकांतिका संगीत नाटक आहे. १९१७ च्या सुमारास लिहिलेल्या या नाटकाचा मुख्य विषय मद्यपानाचे भीषण दुष्परिणाम आणि त्यामुळे होणारा सुखी संसाराचा विध्वंस हा आहे. या नाटकाचे पहिले सादरीकरण २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोद्यात गंधर्व नाटक मंडळीने केले. या नाटकात मद्यपानाचे दुष्परिणाम, कौटुंबिक जीवन आणि मानवी नातेसंबंधांमधील भावनिक चढ-उतार अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आले आहेत.

स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान तर्फे अनेक संगीत नाटके करून, कलाकारांना घेऊन बसवली जातात व संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे प्रयोग केले जातात. यामध्ये सन्मिता धापटे-शिंदे (सिंधू), अभिषेक अवचट (सुधाकर), चंद्रकांत मुळगुंदकर (तळीराम), पूजा पारखी (गीता), निलेश दातार (भगीरथ), सौरभ पाणदरे (रामलाल) यांच्या प्रमुख भूमिका असून एकूण १२ कलाकार आहेत. याचे संगीत दिग्दर्शन सौ. सुचेता अवचट यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
33.6 ° C
33.6 °
33.6 °
42 %
3.4kmh
27 %
Thu
41 °
Fri
42 °
Sat
43 °
Sun
42 °
Mon
42 °

Most Popular

Recent Comments