CBSC EXAM RESULT | पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेच्या निकालात पुणे विभागाने देशात सातवे स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शहरातील अनेक शाळांनी उत्कृष्ट निकाल नोंदवला असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याने पुण्याची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट झाली आहे. CBSE EXAM RESULT
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील सर्व ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा सरासरी निकाल ९०.५ टक्के लागला. अथर्व भिडे याने ९८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तसेच २५ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, तर २९ विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश मिळवले.RESULT
अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. रिधिमा भगवती हिने ९८ टक्के गुणांसह अव्वल येत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि हिंदी या विषयांत पूर्ण गुण मिळवले.
एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ५६.४ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. मूर्तजा रावत याने ९९.८ टक्के, निहार लोहाडे याने ९९.४ टक्के, तर ऋषभ कोरलाहल्ली याने ९९.२ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
ऑर्बिस विद्यालयाच्या मुंढवा आणि केशवनगर या दोन्ही संकुलांचा निकाल शंभर टक्के लागला. केशवनगर येथील शिवांश सिंग याने ९८.६० टक्के, तर मुंढवा येथील जैविक मोटा याने ९८.२ टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल समाधान व्यक्त करत मुंढवा येथील ऑर्बिस विद्यालयाच्या प्राचार्या स्मिता पेंढारकर म्हणाल्या, “यंदाचा निकाल विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीचे प्रतीक आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले आहे.”
सीबीएसई निकालात पुणे विभागाने मिळवलेले सातवे स्थान हे शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक असून, विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक, शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


