42.8 C
New Delhi
Monday, June 8, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञान‘शक्ती समिट २०२६’मध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेचा नवा आराखडा

‘शक्ती समिट २०२६’मध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेचा नवा आराखडा

पुणे : ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेला गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदू इकॉनॉमिक फोरम’ (एचईएफ) पुणे शाखेच्या ‘शक्ती समिट २०२६’चा पुणे आंतरराष्ट्रीय केंद्रात उत्साहात समारोप झाला. उद्योग, तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आर्थिक स्वावलंबन या क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत भविष्यातील भारताचा विकास आराखडा मांडण्यात आला.

परिषदेत एआय क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. ‘पार्टेक्स.एआय’ने ५०० दशलक्ष डॉलर्सचा ‘पुणे एआय व्हिजन’ सादर करत पुण्याला देशातील ‘अप्लाईड एआय’ आणि धोरणात्मक तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र बनविण्याचा संकल्प व्यक्त केला. याशिवाय विविध उद्योग क्षेत्रांशी संबंधित कोट्यवधी डॉलर्सचे सामंजस्य करार आणि गुंतवणूक योजनांचे अनावरणही करण्यात आले.

या परिषदेत धोरणात्मक संरक्षण व एरोस्पेस, हिंदू मंदिर अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्ञान व प्रसारमाध्यमे, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा या विषयांवर सखोल चर्चा झाली. स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देणे, देशांतर्गत गुंतवणूक वाढविणे आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता मजबूत करणे यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘अ‍ॅक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स’ने विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी ‘ऑटोनॉमस सरफेस व्हेईकल’चे सादरीकरण. संरक्षण आणि सागरी तंत्रज्ञान क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी सरकार, उद्योग, संशोधन संस्था आणि गुंतवणूकदार यांच्यातील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताला नाविन्यपूर्ण संशोधन, उद्योजकता आणि धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यपालांनी महाराष्ट्र आणि विशेषतः पुण्याकडे असलेल्या मानवी संसाधनांची, शैक्षणिक संस्थांची आणि औद्योगिक क्षमतेची दखल घेत, विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत पुण्याची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले. विकासाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचेल, अशा सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीवर त्यांनी भर दिला.

एचईएफ पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष तसेच ‘पार्टेक्स.एआय’चे सहसंस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गौरव त्रिपाठी यांनी ‘शक्ती समिट २०२६’मुळे आर्थिक विकासाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात परिवर्तन घडल्याचे सांगितले. भांडवल, उद्योग आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम घडवून आणत भारताच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘पुणे एआय ग्रीड’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पुण्याच्या औद्योगिक आणि डिजिटल क्षमतेचा विस्तार करून शहराला राष्ट्रीय स्तरावरील एआय केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञान यांची प्रभावी सांगड घालून ‘आत्मनिर्भर भारत’च्या ध्येयाला प्रत्यक्ष आर्थिक प्रगतीत रूपांतरित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.8 ° C
42.8 °
42.8 °
9 %
4.4kmh
0 %
Mon
42 °
Tue
45 °
Wed
45 °
Thu
43 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments