farmer News | पुणे : राज्यातील दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीककर्ज (Farm Loan Waiver Maharashtra
) असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून, ‘हेअर कट’मुळे कर्जमाफीच्या यादीत दिसणाऱ्या रकमेबाबत शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम बाळगू नये, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. सरकार आणि संबंधित बँकांमध्ये समन्वय साधून या तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (farmer Loan)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री भरणे बोलत होते. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत सुमारे पाच लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांनीही ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कर्जमाफीच्या यादीत प्रत्यक्ष थकीत रकमेपेक्षा कमी रक्कम दिसत असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, ‘हेअर कट’ हा शेतकऱ्यांच्या कर्जात कपात करण्याचा प्रकार नसून सरकार आणि बँकांमधील आर्थिक समन्वयाचा भाग आहे. कर्जमाफीचा आर्थिक भार सरकार आणि बँका किती प्रमाणात उचलणार, यासाठी ही पद्धत वापरली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष थकीत कर्जावर कोणताही परिणाम होत नाही.
ते पुढे म्हणाले की, काही बँकांमध्ये तांत्रिक कारणांमुळे कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली, तरी पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सर्व तक्रारींची पडताळणी करून संबंधित बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, लवकरच हा संभ्रम दूर केला जाईल.
कर्जमाफीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी संस्थांशी सातत्याने समन्वय साधून कर्जमाफीची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकार कर्जमाफीची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार कृषिमंत्री भरणे यांनी केला. कर्जमाफीच्या रकमेबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


