26 C
New Delhi
Thursday, July 9, 2026
HomeTop Five Newsपुणे मेट्रो लाईन-३ ठरणार अत्याधुनिक!

पुणे मेट्रो लाईन-३ ठरणार अत्याधुनिक!

‘थर्ड-रेल’ आणि CBTC तंत्रज्ञानामुळे प्रवास होणार अधिक वेगवान, सुरक्षित

pune metro | पुणे मेट्रोच्या हिंजवडी–शिवाजीनगर (लाईन-३) मार्गिकेच्या व्यावसायिक सेवेला अंतिम टप्प्यात वेग आला असून, या मार्गावर प्रथमच ७५० व्होल्ट डीसी ‘थर्ड-रेल’ विद्युतीकरण प्रणाली आणि कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या आधुनिक प्रणालीमुळे पुणे देशातील अत्याधुनिक मेट्रो सेवा असलेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळवणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.

पुणे :– हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांबीच्या पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक वैधानिक आणि नियामक प्रक्रिया सुरू आहे. या मार्गिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ७५० व्होल्ट डीसी थर्ड-रेल विद्युतीकरण प्रणालीचा वापर. यामुळे पुणे हे देशातील मोजक्या शहरांपैकी एक ठरणार आहे, जिथे आधुनिक थर्ड-रेल तंत्रज्ञानावर आधारित मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

पारंपरिक ओव्हरहेड विद्युत तारा आणि खांबांच्या ऐवजी या प्रणालीमध्ये रेल्वे रुळालगत स्वतंत्र विद्युतवाहक रेल बसविण्यात येते. मेट्रोच्या डब्याखाली बसविण्यात आलेल्या विशेष कलेक्टर शूद्वारे या रेलमधून थेट वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे ओव्हरहेड वायरची आवश्यकता राहत नाही. परिणामी शहराचे सौंदर्य अबाधित राहते, देखभाल खर्च कमी होतो आणि वीजपुरवठाही अधिक स्थिर राहतो.

हेच तंत्रज्ञान सध्या कोलकाता मेट्रो, बेंगळुरू नम्मा मेट्रो तसेच इतर आधुनिक मेट्रो प्रकल्पांमध्ये यशस्वीपणे वापरले जात आहे. आता पुणेही या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शहरांमध्ये सामील होणार आहे.

थर्ड-रेल प्रणालीसोबतच या मार्गिकेवर कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) ही अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंग प्रणालीही बसविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे मेट्रोगाड्यांचे अचूक स्थान आणि वेग रिअल-टाइममध्ये नियंत्रित केला जातो. त्यामुळे कमी अंतरावरही सुरक्षितपणे गाड्या चालविणे शक्य होते आणि प्रवाशांना अधिक वारंवार सेवा देता येते.

पारंपरिक फिक्स्ड ब्लॉक सिग्नलिंगपेक्षा CBTC प्रणाली अधिक कार्यक्षम असून, भविष्यात स्वयंचलित (ऑटोमेटेड) मेट्रो सेवा सुरू करण्यासाठीही ही यंत्रणा सक्षम आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता, हे तंत्रज्ञान भविष्यातील वाहतूक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दरम्यान, २३ किलोमीटरच्या संपूर्ण एलिव्हेटेड मार्गावर यशस्वी एंड-टू-एंड ट्रायल रन पूर्ण करण्यात आला आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात मान ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर १२ स्थानकांसह मेट्रो सेवा सुरू होईल. त्यानंतर हा मार्ग जिल्हा न्यायालय (डिस्ट्रिक्ट कोर्ट) स्थानकापर्यंत वाढविण्यात येणार असून, तेथून महा मेट्रोच्या विद्यमान नेटवर्कशी थेट जोडणी उपलब्ध होईल.

लाईन-३ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर हा सध्याचा सुमारे ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत ५० टक्क्यांहून अधिक बचत होईल आणि आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचारी तसेच दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


थर्ड-रेल तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे

  • ७५० व्होल्ट डीसी थर्ड-रेलद्वारे थेट वीजपुरवठा
  • ओव्हरहेड तारा व खांबांची आवश्यकता नाही
  • शहराचे सौंदर्य अबाधित राहते
  • वीजपुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह
  • देखभाल खर्च कमी
  • अधिक वारंवार मेट्रो फेऱ्या शक्य
  • कमी प्रतीक्षा वेळ आणि जलद सेवा
  • भविष्यात पूर्णपणे स्वयंचलित मेट्रोसाठी उपयुक्त

लाईन-३ एका नजरेत

  • मार्ग : हिंजवडी – शिवाजीनगर
  • एकूण लांबी : २३ किमी
  • विद्युतीकरण : ७५० व्होल्ट डीसी थर्ड-रेल
  • सिग्नलिंग : CBTC डिजिटल प्रणाली
  • पहिला टप्पा : मान – आर. के. लक्ष्मण संग्रहालय
  • पहिल्या टप्प्याची लांबी : १३.३ किमी
  • स्थानके : १२
  • पूर्ण झाल्यावर प्रवास वेळ : ९० मिनिटांवरून ४५ मिनिटे
  • थेट जोडणी : पुढील टप्प्यात जिल्हा न्यायालय स्थानकातून महा मेट्रो नेटवर्कशी.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
heavy intensity rain
26 ° C
26 °
26 °
87 %
6.1kmh
100 %
Thu
27 °
Fri
35 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
42 °

Most Popular

Recent Comments