35.8 C
New Delhi
Thursday, July 30, 2026
HomeTop Five Newsबीआरटी मार्गावर धावणार तीन डब्यांची इलेक्ट्रिक ‘ईआरटीएस’ बस

बीआरटी मार्गावर धावणार तीन डब्यांची इलेक्ट्रिक ‘ईआरटीएस’ बस

पिंपरी :– पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप देण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील विद्यमान बीआरटी मार्ग आणि भविष्यातील उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) यांना अधिक परिणामकारक बनवण्यासाठी तीन डब्यांची पूर्णपणे विजेवर चालणारी इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (ईआरटीएस) बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून सुमारे १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी महामेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे.( electric bus)

शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे-नाशिक महामार्गाला मुंबई-बंगळूर महामार्गाशी जोडणाऱ्या बीआरटी मार्गावर ही सेवा प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्याचे नियोजन असून, सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महामेट्रोकडून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे. अहवालानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भोसरी गोडाऊन चौक, कुदळवाडी चौक, ऑटो क्लस्टर, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी आणि वाकड चौक या मार्गावरील बीआरटी कॉरिडॉरवर ईआरटीएस बस धावणार आहे. या मार्गावर सध्या पीएमपीएमएलच्या बससेवेची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांना अधिक कार्यक्षम आणि नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या बसची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे ती पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी, तीन डब्यांची आणि उच्च क्षमतेची असेल. एका बसमधून एकावेळी २४० हून अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. मेट्रोप्रमाणे वेगवान आणि आरामदायी अनुभव देणारी ही बस रबर टायरवर धावणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या नियोजनानुसार हा प्रायोगिक टप्पा यशस्वी ठरल्यानंतर शहरातील सर्व बीआरटी मार्ग आणि प्रस्तावित एचसीएमटीआर मार्गांवर ईआरटीएस सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी या सेवेची प्रभावी जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना अखंड, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागानुसार, या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, वायू प्रदूषणात घट होण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मोठी मदत होईल. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देतानाच भविष्यातील वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करून ही व्यवस्था विकसित केली जात आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, नियोजनबद्ध आणि वेळेत प्रकल्पाची अंमलबजावणी करून नागरिकांना सुरक्षित, आधुनिक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. तर सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी तीन डब्यांच्या या बसमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले.

भविष्यातील शाश्वत नागरी विकासाच्या दृष्टीने ईआरटीएस प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.8 ° C
35.8 °
35.8 °
44 %
4.9kmh
82 %
Thu
36 °
Fri
35 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
35 °

Most Popular

Recent Comments